नवी दिल्ली Parliament Winter Session 2023:संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा 8 वा दिवस आहे. मंगळवारी संसदेत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवरुन बराच गदारोळ झाला होता. त्यामुळे विरोधकांनी राज्यसभेत मोठा गोंधळ घालत सदनातून बाहेर पडून निषेध व्यक्त केला होता. आजही संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक मोठा गोंधळ करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि अर्जुन मेघवाल हे विरोधकांना उत्तर देण्याची शक्यता आहे. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सदनात चांगलाच गदारोळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान आज लोकसभेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं पुढं आलं आहे. लोकसभेत आज तीन जण घुसले असून त्यातील दोघांनी गॅलरीत उडी घेतल्यानं मोठा गोंधळ उडाला.
तीन तरुणांनी भेदली लोकसभेची सुरक्षा :लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात आज मोठी सुरक्षेतील चूक उघड झाली आहे. अधिवेशन सुरू असताना तीन तरुण लोकसभेत घुसले होते. यावेळी दोन तरुणांना गॅलरीतून लोकसभेत उडी मारली. त्यांनी आपल्या हातात काहीतरी संशयास्पद वस्तू दाखवून त्यातून वायू सोडण्याचा प्रयत्न केल्याचा दावा खासदार करत आहेत. या तरुणांनी संसदेतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पकडण्यात यश आलं. विशेष म्हणजे आज संसदेवरील हल्ल्याला 22 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्याच दिवशी आज तीन तरुणांनी लोकसभेची सुरक्षा भेदून गॅलरीतून उड्या मारल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
रेल्वे तिकीटावरुन अधिर रंजन चौधरी आक्रमक : रेल्वे तिकीटाच्या भाडेवाढीचा मुद्दा आज सकाळीच संसदेत ऐरणीवर आला. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आठव्या दिवशी लोकसभेत मांडला. रेल्वे तिकीट दरावरुन खासदार अधीर रंजन चौधरी हे चांगलेच आक्रमक झाले. मात्र या विषयावर सविस्तर माहिती घेऊन तुम्हाला उत्तर देतो, असं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं.
नौदलाच्या जवानांना कधी परत आणणार :कतारमध्ये भारतीय नौदलाच्या आठ जवानांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मात्र या जवानांना परत आणण्यासाठी काय उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. या जवानांना कधी परत आणण्यात येणार आहे, असा सवाल काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी केला. कतारमधून भारतीय नौदलाच्या जवानांना परत आणण्यासाठी चर्चा करण्यात यावी, यासाठी खासदार मनीष तिवारी यांनी लोकसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे नौदलाच्या जवानांना परत आणण्याचा मुद्दाही आज चांगलाच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांना जशास तसं उत्तर देण्याची रणनीती आखली आहे.
हेही वाचा :
- Parliament Special Session : आजपासून नव्या संसद भवनात कामकाजाचा 'श्रीगणेशा', जाणून घ्या संपूर्ण तपशील
- Parliament Winter Session : 4 डिसेंबर ते 22 डिसेंबर दरम्यान संसदेचं हिवाळी अधिवेशन
- Parliament Special Session : सोनिया गांधींचं पंतप्रधानांना पत्र, पत्रातून केली 'मोठी' मागणी