नवी दिल्ली Parliament Special Session :संसदेचं विशेष अधिवेशन आजपासून सुरू झालं. विशेष अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी चंद्रयान ३ आणि जी २० च्या यशाचा उल्लेख केला. चंद्रावरील शिवशक्ती पॉइंट नवीन प्रेरणा केंद्र बनलं आहे, असं ते म्हणाले.
जुनी इमारत भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देत राहील : त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहाला संबोधित केलं. नवीन सभागृहात जाण्यापूर्वी येथील प्रेरणादायी क्षण आठवून पुढं जाण्याची ही संधी असल्याचं ते म्हणाले. 'हे खरं आहे की, ही इमारत बांधण्याचा निर्णय परकीय राज्यकर्त्यांचा होता. मात्र आपण अभिमानानं सांगू शकतो की या वास्तूच्या उभारणीत देशवासीयांनी घाम, मेहनत आणि पैसा गुंतवला', असं पंतप्रधान मोदी म्हणाले. '७५ वर्षांच्या प्रवासात या इमारतीनं अनेक ऐतिहासिक क्षण पाहिले. आपण नवीन इमारतीत जात आहोत, परंतु जुनी इमारत भविष्यातील पिढ्यांना कायमच प्रेरणा देत राहील', असं मोदी म्हणाले.
गरीब मुलगा संसदेत पोहोचला : यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील त्यांच्या आठवणींचा उल्लेख केला. 'जेव्हा मी पहिल्यांदा खासदार झालो, तेव्हा या लोकशाहीच्या मंदिरात डोकं टेकवून प्रवेश केला होता. आज रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहणारा एक गरीब मुलगा संसदेत पोहोचला. हीच भारताच्या लोकशाहीची ताकद आहे. देश मला इतके आशीर्वाद देईल आणि माझ्यावर इतके प्रेम करेल याची मी कल्पनाही केली नव्हती, असं मोदी म्हणाले.
कोरोना काळातही काम थांबू दिलं नाही : सभागृहातील सदस्यांना उद्देशून पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोना काळातही आपण देशाचं काम थांबू दिलं नाही. आपण मास्क घालून आलो. तसेच सोशल डिस्टन्सिंगचंही पालन केलं. सदस्यांची सभागृहाशी असलेलं नातं आपण पाहिलं आहे. पूर्वी येथे काम केलेला जुना सदस्य नक्कीच सभागृहाच्या सेंट्रल हॉलमध्ये येतो, असं मोदी म्हणाले. या सदनाला निरोप देणं हा खूप भावनिक क्षण आहे. एखादं कुटुंब जुनं घर सोडून नवीन घरात गेलं तर अनेक आठवणींनी भारावून जातं. हे सदन सोडताना देखील असंच मन भरून येतंय. या सदनाशी अनेक आंबट-गोड क्षण, भांडणं निगडीत आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
२०४७ पर्यंत देशाला विकसित बनवायचंय : 'हे अधिवेशन छोटं असले तरी काळाच्या दृष्टीनं खूप मोठं आहे. हे ऐतिहासिक निर्णयांचं अधिवेशन आहे. या अधिवेशनाचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुमचा ७५ वर्षांचा प्रवास आता एका नव्या ठिकाणाहून सुरू होत आहे. हा प्रेरणादायी क्षण आहे. आता नव्या संकल्पानं, नव्या आत्मविश्वासानं २०४७ पर्यंत देशाला विकसित बनवायचंय', असं मोदी म्हणाले.
संसदेवरील हल्ला देश कधीही विसरणार नाही : संसदेवर दहशतवादी हल्ला झाला. हा हल्ला फक्त एका इमारतीवर झाला नाही, तर तो लोकशाहीच्या जननीवर, आत्म्यावर झाला होता. ती घटना हा देश कधीही विसरू शकत नाही. पण ज्यांनी सभागृह आणि सदस्यांना वाचवण्यासाठी दहशतवाद्यांशी लढताना छातीवर गोळी झेलली त्यांनाही मी सलाम करतो, असं मोदी म्हणाले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी पत्रकारांचीही आठवण काढली. देशात असे काही पत्रकार आहेत ज्यांनी आयुष्यभर संसद कव्हर केली. त्यांनी प्रत्येक क्षणाची माहिती देशापर्यंत पोहोचवली आहे. संसद कव्हर करणाऱ्या पत्रकारांची नावं माहीत नसतील, पण त्यांचं योगदान विसरता येणार नाही, असं ते म्हणाले.
हे सभागृह आणीबाणीचं साक्षी होतं : १९६५ च्या युद्धात लाल बहादूर शास्त्री यांनी या सदनातून देशातील शूर सैनिकांना प्रेरणा दिली होती. हरितक्रांतीचा पायाही याच सभागृहातून रचला गेला. इंदिरा गांधींनीही येथूनचं बांगलादेशचं स्वातंत्र्य मिळवून दिलं. हे सभागृह आणीबाणीचीही साक्ष देतं. पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांनी ग्रामीण मंत्रालयाची स्थापना याच सभागृहातून केली होती, असं मोदींनी सांगितलं.
सभागृहाच्या माध्यमातून अनेक समस्या सोडवण्यात आल्या : अटलजींचं सरकारही याच सभागृहाचं देणं आहे. मनमोहन सिंग यांच्या सरकारचा कॅश फॉर व्होट घोटाळाही या सभागृहात पाहायला मिळाला. या सभागृहाच्या माध्यमातून अनेक समस्याही सोडवण्यात आल्या. या सभागृहात कलम ३७० वरही ठराव करण्यात आला. जीएसटी, वन रँक वन पेन्शन, गरिबांसाठी १० टक्के आरक्षण हेही या सभागृहात झालं. भारताच्या लोकशाहीत आपण अनेक चढउतार पाहिले आहेत. हे सभागृह लोकशाहीचं बलस्थान आहे. हे तेच सभागृह आहे, जिथे ४ खासदार असलेला पक्ष सत्तेत राहायचा, तर १०० खासदार असलेला पक्ष विरोधात राहायचा, असं मोदी म्हणाले.
हेही वाचा :
- Parliament Special Session २०२३ : संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात, जाणून घ्या पहिल्या दिवसाचा प्लॅन