नवी दिल्ली Parliament Security Breach : संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना तरुणांनी संसदेत घुसखोरी करत सदनात स्मोक बॉम्बचा धूर केला होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या घटनेचा मास्टारमाईंड ललित झा याला पकडण्यासाठी जंग जंग पछाडले होते. मात्र मास्टरमाईंड ललित झा यानं दिल्ली पोलिसांपुढं आत्मसमर्पण केलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केलं आहे. ललित झा हा गुरुवारी राजस्थानमध्ये पळून गेल्याची चर्चा करण्यात येत होती. मात्र त्यानंतर तो दिल्ली पोलिसांकडं शरण आला आहे. ललित झा संसद हल्ला प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचा दिल्ली पोलिसांचा आरोप आहे.
मास्टरमाईंड ललित झा याचं पोलिसांपुढं आत्मसमर्पण :दिल्ली संसद हल्ल्यातील मास्टरमाईंड असल्याचा आरोपी ललित झा हा राजस्थानमधील नागौर इथं पळून गेला होता. तिथं तो त्याच्या दोन साथिदारांना भेटला. त्यानंतर त्यांनी एका हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. मात्र पोलीस आपल्या शोधात असल्याची जाणीव त्याला झाली. त्यामुळं त्यानं बस पकडून दिल्लीतील दत्तपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत आत्मसमर्पण केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी वृत्तसंस्थेला दिली.
संसद हल्ल्यातील आरोपीला सात दिवसांची कोठडी :संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. या चारही आरोपींवर यूएपीए ( UAPA ) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं या चारही आरोपींना दिल्लीतील पटीयाला हाऊस न्यायालयात गुरुवारी हजर केलं. या चारही आरोपींना पटीयाला हाऊस न्यायालयानं सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ हरदीप कौर यांनी गुरुवारी मनोरंजन डी, सागर शर्मा, अमोल धनराज शिंदे आणि नीलम देवी या चारही आरोपींना ही सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
मुंबईतून खरेदी केले होते डबे, लखनऊतून विशेष शूज :मनोरंजन डी, सागर शर्मा, अमोल धनराज शिंदे आणि नीलम देवी या चारही आरोपींनी हा कट अमलात आणला होता. त्यासाठी त्यांनी लखनऊतून विशेष शूज खरेदी केले होते, असा दिल्ली पोलिसांचा आरोप आहे. तर मुंबईतून डबे खरेदी केल्याचाही दिल्ली पोलिसांचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळं या आरोपींना चौकशीसाठी मुंबई आणि लखनऊला नेण्याच येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा :
- संसदेच्या हिवाळी अधिवेशनातून 14 विरोधी खासदारांचं निलंबन, 'हे' आहे कारण?
- संसदेचं हिवाळी अधिवेशन 2023 : संसदेच्या सुरक्षेवरून विरोधकांचा गोंधळ; 14 खासदार निलंबित
- 'हा' आहे संसदेतील घुसखोरीचा कथित 'मास्टरमाइंड', 'या' 5 आरोपींना अटक