नवी दिल्ली :मणिपूर हिंसाचारामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक चांगलाच गदारोळ करत आहेत. मणिपूर प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. सरकार मणिपूर प्रकरणावर चर्चेला तयार असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून वारंवार सांगण्यात येत असले, तरी विरोधक ऐकण्याच्या तयारीत असल्याचे दिसत नाहीत. त्यामुळे आजही विरोधक संसदेच्या दोन्ही सभागृहात सरकराला घेरण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे खासदार मनिष तिवारी यांनी मणिपूर प्रकरणावर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे. दुसरीकडे भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे.
LIVE Update :
- सरकार चर्चेसाठी तयार :केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सरकार संसदेत मणिपूर प्रश्नांवर चर्चा करण्यास तयार आहे. मात्र विरोधक चर्चेपासून पळ काढत असल्याचा हल्लबोल केला आहे.
- राज्यसभेतही विरोधक आक्रमक :मणिपूर प्रश्नावरुन विरोधकांनी सरकारला घेरले आहे. राज्यसभेत विरोधकांनी सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव दाखल करण्याचा पवित्रा घेतला आहे. आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
- लोकसभा दोन वाजेपर्यंत तहकूब :मणिपूर हिंसाचारावरुन विरोधक आक्रमक झाल्यामुळे लोकसभा दोन बाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. विरोधकांनी लोकसभेत जोरदार घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला आहे.
- भाजपच्या संसदीय समितीची बैठक :मणिपूर प्रकरणावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरू असताना भाजपने आज संसदीय समितीची बैठक बोलावली आहे. भाजपच्या संसदीय समितीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे.