नवी दिल्ली :मणिपूर हिंसाचारावरुन आक्रमक झालेल्या विरोधकांनी आजही लोकसभेत मोठा गदारोळ केला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यामुळे काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधिर रंजन चौधरी यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या खासदारांनीही आक्रमक भूमिका घेत सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांनी दोन्ही सभागृहात गदारोळ केल्यामुळे लोकसभेपाठोपाठ राज्यसभेचे कामकाजही 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. मात्र आता लोकसभेचे कामकाज सुरु झाले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय न्याय संहिता विधेयक, भारतीय साक्ष संहिता विधेयक आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता विधेयक हे तीन विधेयक लोकसभेत मांडले आहेत.
Live Update :
- अमित शाहांनी लोकसभेत मांडले नागरिक सुरक्षा विधेयक :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत भारतीय न्याय संहिता विधेयक, भारतीय साक्ष संहिता विधेयक, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता विधेयक मांडले आहे. अमित शाह लोकसभेत जोरदार टोलेबाजी करत या विधेयकाबाबतची माहिती देत आहेत.
- विरोधकांचा वॉकआऊट : 'इंडिया'च्या घटक पक्षातील खासदारांनी लोकसभा कामकाजावर बहिष्कार टाकत वॉकआऊट केले आहे. विरोध खासदारांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर घोषणाबाजी सुरू केली आहे.
- लोकसभा पुन्हा तहकूब :लोकसभा सुरू झाल्यानंतर विरोधकांनी पुन्हा जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभा सभापतींनी लोकसभेचे कामकाज पुन्हा अर्ध्या तासासाठी तहकूब केले आहे.
'इंडिया'च्या खासदारांची मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात बैठक :पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपावर निशाना साधला आहे. राज्यसभेतील 'इंडिया' आघाडीच्या खासदारांची विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात बैठक पार पडत आहे. या बैठकीत 'इंडिया'च्या घटक पक्षातील खासदारांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरकारला घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न राहणार आहे.