पानिपत (हरियाणा) Panipat Rape and Murder Case : हरियाणाच्या पानिपतच्या सेक्टर-25 भाग 2 मध्ये असलेल्या एका कारखान्यात बलात्कार केल्यानंतर कारखान्याच्या ठेकेदारानं 15 वर्षीय अल्पवयीन मुलीची वीट आणि दगडानं ठेचून हत्या केली. कारखान्याच्या तिसर्या मजल्यावरील छतावरील कचऱ्याखाली ठेकेदारानं मृतदेह लपवून ठेवला होता. मुलीच्या काकांनी पुतणीचं अपहरण करून कारखान्यात लपवल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. परंतु, पोलिसांनी कुटुंबीयांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. त्यानंतर पीडित कुटुंबानं एसपी ते डीसीपर्यंत दाद मागितली पण कोणतीही कारवाई न झाल्यानं अखेर कुटुंबीयांनी राज्याचे गृहमंत्री अनिल विज आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडं या घटनेची तक्रार केली.
गृहमंत्र्यांच्या आदेशावरुन 24 तासांत खुनाचा उलगडा :घटनेची माहिती मिळताच गृहराज्यमंत्र्यांच्या आदेशानुसार तपास सीआयए वन पोलिसांकडे सोपवण्यात आला. तपासात गुंतलेल्या सीआयए वनच्या पथकानं 24 तासांत या खून प्रकरणाचा खुलासा केला. हत्येचा आरोप असलेल्या ठेकेदाराला पोलिसांनी अटक केलीय. आरोपी ठेकेदाराला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीत घेण्याची तयारी पोलीस करत आहेत.
कुटुंबीयांचे कंत्राटदारावर गंभीर आरोप : अनेक दिवसांनी कुटुंबीयांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांचीही भेट घेतली. आरोपीला पोलिस ठाण्यात बसून चहा प्यायला लावल्याचं कुटुंबीयांनी महिला आयोगाच्या अध्यक्षांना सांगितलं. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी आदेश देऊनही पोलिसांनी याप्रकरणी कठोर कारवाई केली नाही. हे प्रकरण वरिष्ठांपर्यंत पोहोचल्यानंतरही कोणतीही कारवाई न झाल्यानं गृहमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांना जाग आली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी हे प्रकरण सीआयए वन कडे वर्ग केलं.