पंतप्रधान मोदींना 'सेंगोल' सुपूर्द नवी दिल्ली : संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या एक दिवस आधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी त्यांच्या निवासस्थानी अधीनम (पुजारी) यांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. तामिळनाडूहून दिल्लीत आलेल्या अधीनम यांनी यावेळी मोदींना 'सेंगोल (राजदंड)' यासह विशेष भेटवस्तू दिल्या. अनेक विरोधी पक्षांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असताना पंतप्रधान रविवारी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज नवीन संसद भवनाचे उद्घाटन करतील. नवीन संसद भवनाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, असे मोदींनी म्हटले आहे. या भवनाचा व्हिडिओही त्यांनी शेअर केला आहे.
संसद परिसरातील सुरक्षा वाढवली : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनापूर्वी दिल्लीत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कालावधीसाठी नवी दिल्ली जिल्हा कंटेनमेंट झोन म्हणून गणला जाईल आणि येथे वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. नवीन संसदेची इमारत उच्च सुरक्षा क्षेत्रात आहे. या परिसरात अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याबरोबरच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सतत देखरेख ठेवली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कुस्तीपटूंचा नव्या संसदेसमोर निषेध सभेचा इशारा : सुमारे 20 विरोधी पक्षांनी उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. तसेच जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी रविवारी नवीन संसद भवनासमोर निषेध सभा घेण्याचा इशारा दिला आहे. आंदोलक कुस्तीपटू सात महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक करण्याची मागणी करत आहेत. मात्र, कुस्तीपटूंनी जाहीर केलेल्या 'महिला महापंचायत'साठी परवानगी देण्यात आली नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन : एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, संसद भवनाजवळ पुरेसे सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. मध्य दिल्लीत पोलीस पिकेट्स उभारण्यात येत असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा रविवारी सकाळी हवन आणि सर्वधर्म प्रार्थनेने सुरू होईल. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेचे औपचारिक उद्घाटन होईल. या उद्घाटन सोहळ्याला सुमारे 25 पक्षांचे प्रतिनिधी, मुख्यमंत्री आणि मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
- Sengol : नव्या संसदेत बसवण्यात येणारा 'सेंगोल' म्हणजे आहे तरी काय? जाणून घ्या
- Complaint Against Kejriwal Kharge : आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केजरीवाल, खरगे यांच्या विरोधात तक्रार दाखल
- New Parliament Building : पाहा संसदेच्या नव्या इमारतीचे आकर्षक फोटो