बंगळुरू: भाजपाला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी विरोधी पक्ष एकजूट होत आहे. आज आणि उद्या विरोधी पक्षांची बैठक होत आहे. यापूर्वी विरोधकांची पाटण्यात एक सभा झाली होती, त्यानंतर विरोधक आज आणि उद्या बंगळुरूमध्ये एकत्र येत आहेत. बंगळुरूमध्ये होणाऱ्या या बैठकीचा अजेंडा आणि मिनिट टू मिनिटाचा कार्यक्रमही निश्चित करण्यात आला आहे. या बैठकीला सुमारे 24 विरोधी पक्ष उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दिल्ली अध्यादेशाच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर दबाव आणणाऱ्या आम आदमी पक्षानेही या बैठकीत सहभागी होण्याची घोषणा केली आहे. दरम्यान काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी बंगळुरुमध्ये होणाऱ्या विरोधी पक्षाच्या बैठकीसाठी रवाना झाले आहेत.
डिनरसाठी दोन नेत्यांची दांडी : काँग्रेसच्या आवाहानानंतर आजपासून कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या नावाखाली दोन दिवसीय बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत 8 नवीन प्रादेशिक पक्ष सहभागी होण्याची शक्यता आहे. याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बैठकीत सहभागी होण्याची घोषणा केली होती. परंतु त्या आज विरोधी पक्षाच्या डिनर पार्टीत सहभागी होणार नाहीत. ममता बॅनर्जी यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन नुकतेच झाले आहे. यामुळे त्यांना डॉक्टरांकडून काही सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येत आहे, यामुळे त्या डिनरला गैरहजर राहणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही डिनरला जाणार नाहीत.
आधीही झाली होती विरोधी पक्षाची बैठक : यापूर्वी 23 जून रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या आवाहनावर पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक झाली होती. या बैठकीत सर्वपक्षीयांमध्ये झालेल्या चर्चेत कोणताही अर्थपूर्ण निकाल लागला नसल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर काँग्रेसने दुसरी बैठक बोलावली आहे. आता सर्वांच्या नजरा आजच्या बैठकीकडे लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत भाजपला पराभूत करण्यासाठी अजेंडा निश्चित केला जाण्याची शक्यता आहे. परंतु कारण महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलापालथ झाली आहे. विरोधी पक्षातील वरिष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षात फूट पडली आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत जात पुढील वाटचाल सुरू केली आहे. शरद पवार उपस्थित राहणार नसल्याने विरोधकांचे एकमत होणार का का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.