नवी दिल्ली Operation Ajay : हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर, भारतानं आपल्या नागरिकांना सुरक्षित मायदेशी परत आणण्यासाठी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली. 'ऑपरेशन अजय' असं या मोहिमेला नाव देण्यात आल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय. इस्रायलमधून परत येऊ इच्छिणाऱ्या आमच्या नागरिकांना परत आणण्यासाठी 'ऑपरेशन अजय' सुरू करण्यात येत असून त्यासाठी विशेष चार्टर विमानं आणि इतर व्यवस्था करण्यात येणार आहे. आम्ही परदेशातील आमच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध असल्याचंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
इस्रायलमध्ये सुमारे १८ हजार भारतीय : आजघडीला इस्रायलमध्ये सुमारे १८ हजार भारतीय नागरिक अभ्यासासाठी किंवा कामासाठी वास्तव्यास आहेत. यापेकी सुमारे एक हजार विद्यार्थी, तर अनेक आयटी व्यावसायिकांसह हिरे व्यापारी देखील आहेत.
सत्ताधारी आणि विरोधकांचं संयुक्त सरकार स्थापन : दरम्यान, इस्रायलनं हमासशी लढण्यासाठी सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांना एकत्र करून आपत्कालीन संयुक्त सरकार स्थापन केलंय. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, माजी संरक्षण मंत्री आणि मध्यवर्ती विरोधी पक्षनेते बेनी गॅंट्झ यांच्या भेटीत, संयुक्त सरकार स्थापन करण्यास सहमती दर्शविली. हे संयुक्त सरकार पूर्णपणे युद्धावर लक्ष केंद्रित करेल. गॅंट्झच्या नॅशनल युनिटी पार्टीनं जारी केलेल्या संयुक्त निवेदनात ही माहिती देण्यात आलीय. हमासची लष्करी शाखा, अल कासम ब्रिगेडनं दावा केलाय की, त्यांचे दहशतवादी अजूनही इस्रायलमध्ये आहेत आणि लढा सुरू ठेवणार आहेत, अशा वेळी हे सरकार स्थापन करण्यात आलंय.
आतापर्यंत दोन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू : इस्रायलनं गाझावर राज्य करणाऱ्या हमास या इस्लामिक अतिरेकी गटाच्या हल्ल्याविरुद्ध युद्ध पुकारलंय. हमासच्या सैनिकांनी 7 ऑक्टोबर रोजी देशाच्या दक्षिण भागात घुसून भीषण हल्ले केलेत. या काळात इस्रायलवर 5000 हून अधिक रॉकेट डागण्यात आलेत. इस्रायली लष्कराच्या दाव्यानुसार, इस्रायलमध्ये आतापर्यंत 155 सैनिकांसह 1200 हून अधिक लोकं मारले गेले आहेत. तर गाझामधील अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार युद्धात आतापर्यंत 260 मुलं आणि 230 महिलांसह 950 लोकं मारले गेले आहेत.
- याआधीही असे मिशन : यापुर्वीही भारतानं रशिया युक्रेन युद्धात युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा राबविलं होतं. याद्वारे सुमारे 20 हजार भारतीयांना मायदेशात परत आणण्यात आलं होतं. तसंच कोवीड काळातही परदेशात अडकलेल्या भारतीयांना मिशन वंदे भारत अंतर्गत सुखरूप भारतात परत आणण्यात आलं होतं.
हेही वाचा :
- US Secretary Visit Israel : युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री तीन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर
- Israel Palestine Conflict : हजारोंचा बळी गेल्यानं संयुक्त राष्ट्रसंघाला चिंता, इस्राईल-हमास युद्ध थांबविण्याचं केलं आवाहन
- USA in Support of Israel : हमास इस्रायल युद्ध आणखी भडकणार! अमेरिकेची इस्रायलला 'ही' मोठी मदत