नवी दिल्ली Operation Ajay : इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारनं 'ऑपरेशन अजय' सुरू केलंय. इस्रायलच्या तेल अवीव विमानतळावरून 212 भारतीयांना घेऊन पहिले चार्टर विमान आज सकाळी भारतात पोहोचलं. दिल्ली विमानतळावर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी इस्रायलहून परतलेल्या भारतीयांचं स्वागत केलं. परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, आता आमचं भारतीयांना परत आणण्याचं प्राधान्य आहे. त्यानुसार फ्लाइटचं वेळापत्रक केलं जाईल. सध्या यासाठी चार्टर विमानं वापरली जात असली तरी सर्व पर्याय खुले आहेत. गरज पडल्यास भारतीय हवाई दलाची मदत मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वीही अशा परिस्थितीत सैन्यदलाची मदत घेण्यात आलीय.
परराष्ट्रमंत्र्यांनी ऑपरेशन अजयचा घेतला आढावा : परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी काल ‘ऑपरेशन अजय’च्या तयारीचा आढावा घेतला. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, सुमारे 18 हजार भारतीय इस्रायलमध्ये आहेत. त्यांनी स्वत:ची नोंदणी भारतीय दूतावासात करावी. सल्ल्यांचं पालन करावं असं त्यांना आवाहन करण्यात आलंय. वेस्ट बँक आणि गाझा या पॅलेस्टिनी प्रदेशात भारतीय नागरिकांच्या उपस्थितीबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, माझ्या माहितीनुसार काही डझन लोक वेस्ट बँकमध्ये आहेत, तर 3-4 लोक गाझामध्ये आहेत. आत्ता आम्हाला इस्रायलकडून फक्त लोकांना बाहेर काढण्याचे आवाहन करण्यात आले. तेथून एकाही भारतीयाच्या मृत्यूची माहिती आलेली नाही. काहीजण जखमी असून ते रुग्णालयात आहेत.