लखनौ : प्रयागराजमध्ये शनिवारी रात्री उशिरा अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरलदेखील होत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी विरोधकांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. पोलीस दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी प्रयागराजला घेऊन जात होते. पोलिसांच्या ताफ्यासमोर तीन हल्लेखोरांनी गोळीबार करून त्यांची हत्या केली. खून करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. घटनास्थळापासून दोनशे किलोमीटर अंतरावर लखनौ तुरुंगात बंद असलेला अतीकचा मोठा मुलगा उमर वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकून बेशुद्ध पडला. कारागृहातील कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने कारागृह रुग्णालयात नेले. त्याच्यावर येथे उपचार सुरू आहेत.
अतिक अहमदच्या मोठ्या मुलावर उपचार सुरू आहेत : मिळालेल्या माहितीनुसार, लखनौ तुरुंगातील उच्च सुरक्षा कक्षात बंद असलेला अतिक अहमदचा मोठा मुलगा उमर, अतिक आणि अशरफ यांच्या हत्येबाबत तुरुंगातले कैदी बोलत असताना अचानक बेशुद्ध पडला. घाईगडबडीत कारागृह प्रशासनाने त्याला कारागृह रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर येथे उपचार सुरू आहेत. उमर अहमद गुरुवारी त्याचा भाऊ असदच्या एन्काउंटरपासून जेवत नव्हता. शनिवारी तो असदचा अंत्यविधी टीव्हीवर पाहण्याचा आग्रहही करत होता.