नवी दिल्ली Bajrang Punia Returned Padma Shri : भारतीय कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया यानं पंतप्रधान मोदींना एक लांबलचक पत्र लिहिलंय. या पत्रात त्यानं आपल्या मागण्या ऐकल्या जात नसल्यानं 'पद्मश्री' पुरस्कार परत करत असल्याचं म्हटलंय.
फूटपाथवर ठेवला 'पद्मश्री' पुरस्कार : 'पद्मश्री' पुरस्कार परत करण्याची घोषणा केल्यानंतर बजरंग पुनिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार परत करण्यासाठी निघाला होता. परंतु, पंतप्रधान मोदींच्या घराजवळ आल्यावर सुरक्षारक्षकांनी बजरंगला रोखलं होतं. बजरंग पंतप्रधानांपर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळं त्यानं पंतप्रधानांच्या घराजवळच्या फूटपाथवर 'पद्मश्री पुरस्कार' ठेवला आणि तिथून निघून गेला. याबाबतचा व्हिडिओ काँग्रेसने 'एक्स' या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
का केलं पदक परत : या वर्षाच्या सुरुवातीपासूनच काही भारतीय कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघातील ब्रिजभूषण सिंह यांच्या मनमानी आणि हुकूमशाहीच्या विरोधात आंदोलन करत आहेत. ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याचाही आरोप आहे. ब्रिजभूषण सिंह हे भाजपाचे खासदार आहेत. तसंच दीर्घकाळ भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष राहिले आहेत. कुस्तीपटूंच्या प्रदीर्घ आंदोलनानंतर ब्रिजभूषण यांना नुकतंच अध्यक्षपद सोडावं लागलं. मात्र, ज्या नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली, ते ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय आहेत. अशा परिस्थितीत गेल्या 11 महिन्यांपासून सुरू असलेलं कुस्तीगीरांचं आंदोलन पूर्णपणे निष्प्रभ ठरलंय. यामुळंच बजरंग पुनियानं आपला पुरस्कार परत करण्याची घोषणा केलीय.
जानेवारीपासून कुस्तीपटूंचं आंदोलन सुरू : हे आंदोलन पूर्णपणे निरर्थक राहिल्यानंतर तसंच केंद्र सरकारनं महिला कुस्तीपटूंच्या तक्रारींकडे लक्ष न दिल्यानं भारताची ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक हिनं गुरुवारी कुस्ती सोडण्याची घोषणा केली होती. बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांच्या नेतृत्वाखाली ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं होतं. जानेवारीपासून सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये आतापर्यंत बरेच काही घडलंय.
मी माझा 'पद्मश्री' परत करत आहे : पुनियानं आपल्या पत्रात लिहिलं की, मला 2019 मध्ये 'पद्मश्री' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारानं मला सन्मानित केलं. हा सन्मान मिळाल्यावर मला खूप आनंद झाला, यामुळं जीवन यशस्वी झाल्याचं वाटत होतं. पण आज मी त्याहून अधिक दुःखी आहे आणि हे सन्मान मला दुखावत आहेत. याचं कारण म्हणजे, ज्या कुस्तीसाठी आम्हाला हा मान मिळतो, आमच्या सहकारी महिला कुस्तीपटूंना त्यांच्या सुरक्षेसाठी कुस्ती सोडून द्यावी लागते. खेळामुळं आपल्या महिला खेळाडूंच्या जीवनात प्रचंड बदल घडून आला. पूर्वी ग्रामीण भागात मुलं-मुली एकत्र खेळताना दिसतील याची कल्पनाही करता येत नव्हती. पण नव्या पिढीतील महिला खेळाडूंच्या धाडसामुळं हे घडू शकलं. तुम्हाला प्रत्येक गावात मुली खेळताना दिसतील आणि त्या खेळण्यासाठी देश-विदेशातही जात आहेत. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'च्या ब्रँड अॅम्बेसेडर बनणाऱ्या मुलींना अशा परिस्थितीत टाकण्यात आलं की, त्यांना त्यांच्या खेळापासून मागं हटावं लागलं. आम्ही पैलवान काही करु शकलो नाही. महिला कुस्तीपटूंचा अपमान केल्यानंतर मी माझं आयुष्य सन्माननीय म्हणून जगू शकणार नाही, असं जीवन मला आयुष्यभर त्रास देईल. म्हणूनच हा सन्मान मी तुम्हाला परत करत आहे.
हेही वाचा :
- दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या क्रिकेट कसोटी मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का; विराट तातडीनं परतला मायदेशी, ऋतुराजही मालिकेतून बाहेर
- संजय सिंहांची WFI अध्यक्षपदी निवड होताच कुस्तीपटू साक्षी मलिकची निवृत्तीची घोषणा; पत्रकार परिषदेत बोलताना अश्रू अनावर