कोप्पल (कर्नाटक):कर्नाटक सरकारने 200 युनिटपर्यंत मोफत वीज योजना 'गृह ज्योती' जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी १८ जूनपासून अर्जही भरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, त्याआधीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोप्पल जिल्ह्यातील एका वृद्ध महिलेला १,०३,३१५ रुपयांचे वीज बिल आल्याने धक्का बसला. कोप्पलमधील भाग्यनगरमध्ये राहणारी गिरिजम्मा यांना हे लाखभर वीज बिल आले आहे.
कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार - रडत रडत गिरिजम्मा यांनी सांगितले की, घरात रोज फक्त दोनच दिवे लागतात आणि एक लाख रुपयांचे बिल आले आहे. यापूर्वी गिरिजम्माच्या घराचा भाग्य ज्योती योजनेत समावेश करण्यात आला होता. त्या पुढे म्हणाल्या की, GESCOM कर्मचाऱ्यांनी सहा महिन्यांपूर्वी नवीन मीटर बसवले होते, त्यामुळे बिल जास्त येत आहे. पूर्वी 70 ते 80 रुपयांपर्यंत बिल यायचे. गिरिजम्मा म्हणाली, अवघ्या ६ महिन्यांत वीज बिल १ लाख रुपयांपेक्षा जास्त आले आहे.
भाग्य ज्योती योजना ही मागील सरकारने गरिबांसाठी राबवलेली मोफत वीज योजना होती. या योजनेंतर्गत केवळ ४० युनिट मोफत विजेची परवानगी आहे. यासोबतच जादा वीज वापरल्यास त्याचे बिलही भरावे लागणार आहे.
झोपडीचे बिल लाखभर रुपये -गिरीजम्मा म्हणाल्या, मी राहत असलेल्या छोट्या झोपडीत फक्त २ बल्ब आहेत. तसेच, मी मिक्सर वापरत नाही. आताही मी मसाले बारीक करून हाताने शिजवते. इतके बिल नवीन मीटर बसवल्यानंतर आले आहे. एवढं मोठं बिल कसं भरणार? असा प्रश्न गिरिजम्मा यांना पडला आहे.
नागरिक संतप्त - गिरीजम्मा एका लहानशा टिनशेडच्या घरात राहतात. एक वेळच्या पोटापाण्यासाठी धडपडणारी ही आजी लाखांचे बिल भरण्यासाठी धडपडत आहे. GESCOM अधिकाऱ्यांच्या या चुकीमुळे लोक संतप्त झाले आहेत. कोप्पल GESCOM कार्यकारी अभियंता राजेश यांनी भाग्यनगर येथील गिरिजम्मा यांच्या घरी भेट देऊन बिल भरण्याची गरज नसल्याचे आश्वासन दिले आहे.
कारवाईचे आश्वासन : अभियंता म्हणाले की आम्ही बिल सुधारित करू, हे भाग्य ज्योती वीज कनेक्शन आहे. जास्त वीज वापरली जात नाही. आमचे कर्मचारी आणि बिल जमा करणारे बेफिकीर आहेत. दोषींवर कारवाई केली जाईल. अशी काही प्रकरणे असतील, तर जनतेने ती आमच्या निदर्शनास आणून दिली, तर आम्ही त्यात लक्ष घालू.
असाच प्रकार यापूर्वीही समोर आला होता:काही दिवसांपूर्वी दक्षिण कन्नड जिल्ह्यातील उल्लाल येथील एका घरालाही ७ लाख रुपयांचे वीज बिल आले होते. बिल बघून नागरिक संतप्त झाले होते. उल्लाल येथील रहिवासी सदाशिव आचार्य यांना असे वीज बिल आले होते. नंतर अधिकाऱ्यांनी आपली चूक मान्य केली होती..