पणजी - गोव्यातील एक दिग्गज राजकारणी म्हणून प्रतापसिंह राणे यांची ओळख आहे. काँग्रेसचे जुने नेते आणि कार्यकर्ते असलेल्या माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना आजीवन कॅबिनेट पदाचा दर्जा देण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला. सर्वच पक्षांनी त्यांना हा बहुमान दिला. या निवडणुकीत राणे यांनी पोरीम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र त्यांनी नंतर माघार घेतली. त्या जागी काँग्रेस पक्षाने रणजित राणे यांना उमेदवारी जाहीर केली. दुसरीकडे राणेंच्या सून दिव्या राणे यांनी भाजपच्या तिकिटावर ही निवडणूक लढवली. त्या या निवडणुकीत जिंकून आल्या आहेत. प्रतापसिंह राणे यांचे चिरंजीव राज्याचे रोग्यमंत्री विश्वजित राणे हे देखील भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. पिता पुत्र दोन वेगवेगळ्या विरोधी पक्षामध्ये असल्याने याला कौटुंबिक कलहाची किनार होती. मात्र राणे यांना आजीवन कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आल्याने त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याची चर्चा होती.
आलेमाओ यांचा पराभव
गोव्यातील आणखी एक मोठे राजकीय व्यक्तिमत्व म्हणजे चर्चिल आलेमावो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेल्या चर्चिल आलेमाओ यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यांनी तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश केला. गोवा राज्यात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकमेव आमदार होते. त्यांनी गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तृणमुल काँग्रेसमध्ये विलीन केला. गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच काँग्रेस पक्षासोबत सत्तेत सहभागी व्हायची. मात्र मागच्या दोन टर्ममध्ये काँग्रेस सत्तेपासून दूर राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सत्तेपासून दूर होता. यामुळेच चर्चिल आलेमाव यांनी मधल्या काळात भाजपशी जुळवून घेतल्यामुळे नाराज काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने चर्चिल आलेमाव यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. आलेमाव यांनी बाणवली मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला.