भुवनेश्वर - सोशल मिडियाची जादू तर तुम्हाला माहितीच आहे. काही वेळातच व्हिडिओ, पोस्ट, फोटो सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होतात. अनेक जण याचा चुकीचा वापर करतात. मात्र, सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास काही चांगल्या गोष्टीही घडू शकतात. अशीच एक घटना ओडिशाच्या कोरापुटमध्ये घडली आहे. उच्च शिक्षणासाठी एका युवकाने सोशल मीडियावरद्वारे केवळ तीन तासांमध्ये 37 लाखांची मदत मिळवली आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी सोशल मीडियावर मागितली मदत; तीन तासांत जमा झाले 37 लाख
उच्च शिक्षण घेण्यासाठी मजबूत इच्छाशक्ती असलेल्या सुमित तुरुक या युवकाने तीन तासांत 37 लाख रुपये जमा केले आहेत. ही घटना ओडिशाच्या कोरापुटमध्ये घडली आहे.
कोरापुटच्या नारायण पटणा ब्लॉकमधील सुमित तुरुक या तरुणाला शिक्षणाची ओढ होती. उच्च शिक्षणासाठी त्याने दिल्ली जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेशासाठी फार्म भरला. आनंदाची बाब म्हणजे त्याला इग्लंडला जाऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी परवानगी मिळाली. मात्र, ऑक्सफर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती तो मिळवू शकला नाही. परिस्थिती प्रतिकूल असल्याने तो शुल्क भरू शकत नव्हता. ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी त्याला जवळपास 47 लाखांची गरज होती. राज्य सरकारकडून मदत मिळावी म्हणून त्याने ओडिशा सरकारशी संपर्क साधला. मात्र, उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करता येईल, अशी कोणतीही योजना नसल्याचे त्याला सांगण्यात आले. यामुळे तो हताश झाला.
शिक्षणाची ओढ त्याला शांत बसू देत नव्हती. त्याने शक्कल लढवली आणि सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत मागितली. काही वेळातच निधी संकलन संस्थांनी त्याला सहकार्य केले. तीन तासामध्ये त्याने 37 लाख रुपये जमवले. येत्या 30 जूनच्या पूर्वी तो उर्वरीत 10 लाख रुपये जमा करेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो ओडिशाच्या ग्रामीण भागातील मुलांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तो म्हणाले. मजबूत इच्छाशक्ती असल्यास स्वप्न पूर्ण करताना येणाऱ्या अडचणींवर मात करता येते, हे त्याने दाखवून दिले.