महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

OCCRP Report On Adani : अदानी समूह पुन्हा अडचणीत? विदेशी कंपनीच्या माध्यमातून व्यवहाराचा ओसीसीआरपीचा अहवाल - शेअर्स खरेदी

(OCCRP Report On Adani) अदानी समूहावर पुन्हा एकदा विदेशी कंपनीच्या माध्यमातून व्यवहार करण्यात आल्याचा आरोप 'ओसीसीआरपी'नं केल्यानं खळबळ उडाली आहे. कंपनीनं मॉरिशसमधील गुंतवणूकदारांच्या माध्यमातून शेअर्स खरेदी केल्याचा दावा ओसीसीआरपीनं केला. मात्र अदानी कंपनीनं हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Occrp Report On Adani
संग्रहित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2023, 1:54 PM IST

Updated : Aug 31, 2023, 2:31 PM IST

नवी दिल्ली : 'हिंडेनबर्ग' अहवालात अदानी समूहावर अनेक आरोप करण्यात आले होते. त्यामुळे अदानी समूहाचे शेअर्स मोठ्या प्रमाणात गडगडले होते. आता पुन्हा अदानी समूहावर हिंडेनबर्ग 2.0 चा आरोप करण्यात येत आहे. मॉरिशसमधील विदेशी कंपनीच्या माध्यमातून व्यवहार केल्याचा आरोप संघटित गुन्हे आणि भ्रष्टाचार अहवाल प्रकल्पानं ( Organized Crime and Corruption Reporting Project ) गुरुवारी केल्यानं पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. मात्र अदानी कंपनीनं हे आरोप फेटाळून लावले आहेत. यात काहीच नवीन नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ओसीसीआरपी ही जॉर्ज सोरोस आणि रॉकफेलर ब्रदर्स यांनी दिलेल्या निधीवर चालणारी संस्था आहे.

विदेशी कंपनीनं खरेदी केले अदानी समूहाचे शेअर्स :ओसीसीआरपीनं अदानी समूहावर आरोप केल्यानं पुन्हा एकदा अदानी समूह अडचणीत आला आहे. ओसीसीआरपीनं टॅक्स हेव्हन्स आणि अदानी ग्रुपच्या अंतर्गत ईमेल्सचा हवाला देऊन हे आरोप केले आहेत. ओसीसीआरपीच्या तपासणीत किमान दोन प्रकरणं आढळून आली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अज्ञात गुंतवणूकदारांनी अशा ऑफशोर स्ट्रक्चर्सद्वारे अदानी शेअर्सची खरेदी आणि विक्री केली. नासेर अली शाबान अली आणि चँग चुंग लिंग या दोन व्यक्तींचे अदानी कुटुंबाशी दीर्घकाळचे व्यावसायिक संबंध असल्याचा दावा ओसीसीआरपीनं OCCRP या अहवालात केला आहे.

दोन गुंतवणूकदारांची नावं केली उघड : ओसीसीआरपीनं अदानी समूहात दोन विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्याचा दावा केला आहे. नासिर अली शाबान अहली आणि चांग चुंग लिंग या दोन गुंतवणूकदारांनी गौतम अदानी यांचा मोठा भाऊ विनोद अदानी यांच्याशी संबंधित कंपन्यांमध्ये संचालक आणि भागधारक म्हणून काम केल्याचा दावा केला. या गुंतवणूकदारांच्या माध्यमातून अदानी स्टॉकची खरेदी विक्री विदेशी कंपनीद्वारे करण्यात आल्याचंही ओसीसीआरपीनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अदानी समूहाला या गुंतवणूकदारांमुळे मोठा नफा मिळाला. कंपनीनं विनोद अदानी यांच्या कंपनीला सल्ला देण्यासाठी पैसे दिल्याचं कागदपत्रांवरून दिसून आलं असंही ओसीसीआरपीच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

जुनेच आरोप असल्याचा अदानी समूहाचा दावा : हिंडेनबर्ग अहवालात अदानी समूहाला मोठी किंमत चुकवावी लागली होती. आता पुन्हा नव्यानं ओसीसीआरपीनं आरोप केल्यानं पुन्हा एकदा अदानी समूह अडचणीत आला आहे. मात्र अदानी कंपनीनं हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. मॉरिशसच्या निधीची माहिती अगोदरच हिंडेनबर्ग अहवालात आली होती. त्यावेळी कंपनीनं याबाबतची माहिती दिली आहे. अदानी समूह सगळ्या नियमांचं पालन करुनच व्यवहार करत असल्याचं अदानी कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. कंपनीनं ओसीसीआरपीचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

Last Updated : Aug 31, 2023, 2:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details