कोलकाता - भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून बंगालमध्ये हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या दोन दिवसांपासून हावडा आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यात प्रचंड हिंसाचार झाल्यानंतर आता रविवारी (दि. 12 जुन )रोजी संध्याकाळी नादिया जिल्ह्यातील बेथुआदहरी स्टेशनवर एका समुदायाच्या लोकांनी गोंधळ घातला. बदमाशांच्या जमावाने स्टेशनवर अचानक हल्ला केला आणि प्रचंड तोडफोड केली. स्टेशनवर उभ्या असलेल्या राणाघाट-लालगोला लोकल ट्रेनलाही लोकांनी टार्गेट करून तिची प्रचंड तोडफोड केली.
पूर्व रेल्वेच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यामुळे रेल्वे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचवेळी या घटनेमुळे राणाघाट-लालगोला रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवाही सुमारे दोन तास विस्कळीत झाली होती. हल्ल्याची माहिती मिळताच जीआरपी, आरपीएफ आणि पोलीस मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळी पोहोचले. तत्पूर्वी, नंगानाच घडवून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेमुळे येथे प्रचंड तणावाचे वातावरण आहे. प्रवाशांमध्येही घबराट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यापूर्वी एका समुदायाच्या लोकांनी बेथुआदहरी भागात रॅली काढून रास्ता रोकोही केला होता. यानंतर पोलिसांनी गतिरोधक हटवल्यानंतर चोरट्यांच्या जमावाने अचानक स्टेशन गाठले आणि तोडफोड केली. पोलीस आणि आरपीएफ घटनास्थळी पोहोचेपर्यंत हल्लेखोरांनी एकच गोंधळ घातला. त्यानंतर सर्वजण पळून गेले.