त्रिपुरा - कोरोनाच्या रुग्णांची ( Corona Patient ) वाढत असलेली संख्या त्रिपुरा सरकारच्या चिंतेत भर घालीत आहे. यामुळे राज्य सरकार सतर्क झाले आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी त्रिपुरा सरकारने ( Tripura Government ) सोमवारपासून मास्क न घालणाऱ्यांना 200 रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
मास्क वापरणे अनिवार्य -रविवारी (17 जुलै) ETV भारतशी बोलताना एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यभरात सोमवारपासून (18 जुलै) नागरिकांनी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे न केल्यास त्यांच्यावर दंड आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. “आम्ही सर्व नागरिकांना मास्क घालण्याची विनंती करत आहोत. बाजारपेठा, मॉल्स इत्यादी सार्वजनिक ठिकाणी आवाहन केले जात आहे, परंतु नागरिक प्रशासनाच्या आवाहनाकडे आणि विनंत्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. 18 जुलैपासून सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांकडून 200 रुपये दंड आकारला जाईल.”