तेजपूर (आसाम) :मणिपूरमधील 11 वर्षीय पर्यावरण कार्यकर्ता लिसिप्रिया कांगुजम हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना साद घातली आहे. तिने मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावरून मोदींवर टीका केली. पंतप्रधानांनी, 'मन की बात' ऐवजी, 'मणिपूर की बात' करावी, अशी मागणी तिने केली आहे.
आम्हाला 'मणिपूर की बात' ऐकायची आहे : रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम झाला. यानंतर लिसिप्रियाने एका ट्विटद्वारे तिची कैफियत मांडली. 'प्रिय पंतप्रधान जी, आम्हाला तुमची 'मन की बात' ऐकायची नाही. आम्हाला 'मणिपूर की बात' ऐकायची आहे. आम्ही मरत आहोत, असे ट्विट तिने केले. दुसर्या एका ट्विटद्वारे लिसिप्रिया हिने मोदींवर टीका केली. 'इम्फाळमध्ये झालेल्या निदर्शनात 3 लाखांहून अधिक लोक सहभागी झाले होते. त्यांनी या प्रदेशात शांतता आणि स्थिरतेची मागणी केली आहे. मणिपूर तोडण्यासाठी बाह्य शक्तींच्या होत असलेल्या हस्तक्षेपाला आज इंफाळमध्ये प्रचंड विरोध झाला. मणिपूर एक आहे, आम्ही सर्व एक आहोत! धन्यवाद, मोदीजी आम्हाला एकत्र केल्याबद्दल!', असे उपहासात्मक ट्विट तिने केले.
विरोधी पक्षाच्या नेत्यांवरही टीका : लिसिप्रिया हिने मणिपूरमधील आश्रय शिबिरांना भेट देणार्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवरही टीका केली. 'ते केवळ फोटो साठी आणि सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी पीडितांचा वापर करत आहेत', असे ती म्हणाली. लिसिप्रियाच्या म्हणण्यानुसार, या नेत्यांनी मणिपूरच्या लोकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी किंवा हिंसाचार रोखण्यासाठी कोणतीही ठोस कृती केलेली नाही. मणिपूरमध्ये विशेषत: चुराचंदपूर, चांडाल आणि कांगपोकपी जिल्ह्यांमध्ये गेल्या 3 महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे.
अद्याप हिंसाचार थांबलेला नाही : मणिपूरमध्ये 3 मे पासून परिस्थिती चिघळण्यास सुरुवात झाली. 88 दिवसांनंतरही अद्याप येथील हिंसाचार थांबलेला नाही. मणिपूरची ही दुर्दशा गंभीर चिंतेची बाब आहे. आता लिसिप्रिया कांगुजम सारख्या कार्यकर्त्या राज्याच्या उज्वल भविष्याची मागणी करत जनतेचा आवाज बनून पुढे येत आहेत. त्यांनी या प्रदेशात शांतता आणि सुरक्षितता पुनर्संचयित करण्यासाठी अधिकाऱ्यांना ठोस कारवाई करण्याची विनंती केली आहे.
हेही वाचा :
- Manipur Violence : मणिपूरच्या राज्यपालांची मदत छावण्यांना भेट, 'त्या' दोन महिलांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर
- Sanjay Raut on Manipur : मणिपूरबाबत खालच्या थराला जाऊन भाजपाची टीका म्हणजे...; संजय राऊतांचा हल्लाबोल
- Manipur Violence : मणिपूर व्हायरल व्हिडिओची होणार सीबीआय चौकशी, एफआयआर नोंदवला