पाटणा - नितीश कुमार यांचा शपथविधी सोहळा राजधानी पाटण्यातील राजभवनात होणार आहे. राज्यपाल फागू चौहान हे नितीश कुमार यांना शपथ देतील. नितीश कुमार यांच्यासमवेत अनेक मंत्र्यांनी शपथ घेण्याचीही शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळा दुपारी चारच्या सुमारास होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, सोशल डिस्टन्सिंग यासारख्या मूलभूत प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे, मास्क वापरणे सक्तीचे केले आहेत.
शपथविधीची तयारी अंतिम टप्प्यात-
यापूर्वी एनडीएच्या आमदारांनी नितीश कुमार यांना त्यांचा नेता म्हणून निवडले. रविवारी झालेल्या एनडीएच्या बैठकीत नितीश कुमार यांना विधिमंडळ नेते म्हणून निवडण्यात आले. यानंतर नितीश यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेतली. तसेच सरकार स्थापनेसाठी प्रस्ताव सादर केला आहे. आता त्यांच्या शपथविधीची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
अमित शहा आणि जे पी नड्डा राहतील उपस्थित-
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा हे नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहतील, असे पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे.
तेजस्वी यादव राहणार अनुपस्थित-
तसेच, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव बिहारच्या नितीशकुमार यांच्या पाटणा येथे होणार्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत.