चेन्नई :राष्ट्रीय गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ( PFI ) संबंधित असलेल्या विविध ठिकाणावर छापेमारी केली आहे. यात चेन्नईमध्ये राष्ट्रीय गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांनी तिरुवोटीयुर धनगल न्यू कॉलनी भागातील अब्दुल रझ्झाकच्या घरावर छापेमारी केली आहे. त्यासह एनआयएने थेनी, मदुराई आणि दिंडीगुलसह तब्बल आठ ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे.
मदुराईच्या क्षेत्रीय अध्यक्षाच्या घरावरही छापेमारी :राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ( NIA ) तामिळनाडूतील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अनेक ठिकाणावर छापेमारी केली आहे. यात राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या NIA अधिकाऱ्यांचे पथक दिंडीगुल जिल्ह्यातील पलानी नेताजी नगरातही पोहोचले आहे. नेताजी नगरात राहणारे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया मदुराईचे क्षेत्रीय अध्यक्ष कैसर यांच्या घरावरही छापेमारी करण्यात आली आहे.
केरळ कर्नाटकात पसरवला दहशतवाद :आज सकाळी एनआयएने पीएफआयच्या तब्बल आठ ठिकाणी छापेमारी केली आहे. बेकायदेशीर कृत्य करण्यासह पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने दहशतवादाचे समर्थन केल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यामुळे केंद्र सरकारने बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा (UAPA) अंतर्गत गृह मंत्रालयाने 28 सप्टेंबर 2022 रोजी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर ( PFI ) पाच वर्षासाठी बंदी घातली आहे. केरळ आणि कर्नाटकात दहशतवादी कारवाया केल्याचा आरोप पीएफआयवर करण्यात आला होता. त्यानंतर NIA च्या रडारवर असलेल्या पदाधिकाऱ्यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना बरखास्त केली आहे.
एनआयएने 37 बँक खाती गोठवली :देशविघातक कृत्यात सहभागी असल्याच्या संशयावरुन एनआयएने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची मार्च 2023 पर्यंत तब्बल 37 बँक खाती गोठवली आहेत. गेल्या वर्षी एप्रिलपासून संस्थेशी संबंधित 19 संशयितांची 40 बँक खाती गोठवण्यात आली होती. गुवाहाटी, सुंदीपूर, इंफाळ, कोझिकोड, चेन्नई, नवी दिल्ली, जयपूर, बंगळुरू, हैदराबाद आणि कुरनूलसह देशभरात या बँक खात्यांवर कारवाई करण्यात आली.