पुणे- राष्ट्रीय तपास यंत्रणेने आज (बुधवार) खलिस्तानी दहशतवाद्याला दिल्ली विमानतळावर अटक केली आहे. गुरजीत सिंग निज्जर असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव असून पुणे येथील एका प्रकरणात त्याचा सहभाग होता. मात्र, तो परदेशात लपून बसला होता. महाराष्ट्रातही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.
सायप्रस देशात गेला होता पळून
गुरजीत निज्जर हा मुळचा अमृतसरमधील अजनाला येथील आहे. २०१७ साली तो भारतातून पळून गेला होता. त्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला फरारी घोषित केले होते. पुढील तपासासाठी त्याला मुंबईलाही आणण्यात येणार आहे. पुणे खलिस्तानी प्रकरणात सहभाही असलेल्या खलिस्तानी दहशतवाद्याला दिल्ली विमानतळावर अटक केली असून तो सायप्रस देशात लपून बसल्याची माहिती एनआयएने अधिकृतरित्या दिली आहे.
हेही वाचा -वॉशिंग्टनमधील गांधींच्या पुतळ्याची विटंबना; शेतकरी आंदोलनाआडून खलिस्तानी चळवळीचे कृत्य
सोशल मीडियाच्या माध्यमांतून तरुणांची माथी भडकावण्याचा प्रयत्न
एनआयएने २०१९ साली निज्जर आणि दुसरा एक आरोपी हरपाल सिंगवर महाराष्ट्रात गुन्हा दाखल केला होता. निज्जर हा मुख्य गुन्हेगार असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तो तरुणांना खलिस्तानी चळवळीत सहभागी होण्यासाठी भडकावत असे. भारतात खलिस्तानी चळवळ पुन्हा उभी करण्यासाठी तो कार्यरत होता.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री बिनत सिंग यांची हत्या करणारा दहशतवादी जगत सिंग हावरा याची स्तुती करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट, ऑपरेशन ब्लू स्टार, खलिस्तानी चळवळीशी संबधीत पोस्ट आणि व्हिडिओ तो सोशल मीडियावर टाकत असे. त्याद्वारे तरुणांना दहशवादाच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न निज्जरचा होता.
हेही वाचा -पंजाब : खलिस्तानी चळवळीशी संबंधीत दोन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या