लखनऊ :उत्तर प्रदेशच्या मुरादाबामध्ये एका मंदिरात नवविवाहितेचा मृतदेह आढळून आला आहे. मंदिराच्या रेलिंगला लटकलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला. अवघ्या एका महिन्यापूर्वीच या महिलेचे लग्न झाले होते. या महिलेने आत्महत्या केल्याचे तिच्या सासरच्यांचे म्हणणे आहे. मात्र हुंड्यासाठी तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई..
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पाकबडा पोलीस ठाणे परिसरात राहणाऱ्या रिंकीचे लोदीपूर विशनपूरमध्ये राहणाऱ्या दीपकसोबत एका महिन्यापूर्वी लग्न झाले होते. रविवारी या गावातील एका मंदिराच्या रेलिंगला लटकलेल्या अवस्थेत रिंकीचा मृतदेह दिसून आला. यानंतर संपूर्ण गावात खळबळ माजली. यानंतर तिच्या माहेरच्यांनी सासरच्या व्यक्तींवर हत्येचा आरोप करत मझोला पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी सांगितले, की शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.