नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते (अजित पवार गट) प्रफुल्ल पटेल दिल्लीतील एनडीएच्या बैठकीत सहभागी झाल्यानंतर मुंबईला रवाना झाले. भारतीय जनता पक्षाने 18 जुलै रोजी दिल्लीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या 38 पक्षांची बैठक घेतली होती. एनडीएच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. पीएम मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एनडीएची बैठक आयोजित करण्यात आली होती. रात्री उशिरा प्रफुल पटेल, एकनाथ शिंदे व अजित पवार दिल्लीहून मुंबईला रवाना झाले होते.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा अविभाज्य भाग : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते प्रफुल्ल पटेल हे यापूर्वी पाटणा येथे गेल्या महिन्यात झालेल्या विरोधकांच्या बैठकीला उपस्थित होते. ते मंगळवारी दिल्लीतील एनडीएच्या बैठकीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा अविभाज्य भाग आहे. त्यांचा पक्ष भविष्यात एनडीएसोबत काम करेल, असे ते म्हणाले. एनडीएच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त 38 राजकीय पक्ष उपस्थित होते. आमच्या बाजूने अजित पवार यांनी बैठकीत आपले विचार मांडले, असे अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.