नवी दिल्ली : दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये मंगळवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीला संबोधित करताना मोदी म्हणाले की, 'एनडीए हा अटलजींचा वारसा आहे. लालकृष्ण अडवाणी यांनीही त्याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली'. ते म्हणाले की, 'हीच ती वेळ आहे जेव्हा देश येत्या 25 वर्षांत आपले ध्येय साध्य करण्यासाठी पावले उचलत आहे. हे ध्येय विकसित आणि आत्मनिर्भर भारताचे आहे', असे मोदी म्हणाले.
'आम्ही कधीही नकारात्मक राजकारण केले नाही' : नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही विरोधी पक्षात असतानाही सकारात्मक राजकारण केले. आम्ही कधीही नकारात्मक राजकारण केले नाही. विरोधी पक्षात राहून आम्ही सरकारांना विरोध केला, त्यांचे घोटाळे चव्हाट्यावर आणले, मात्र जनादेशाचा अपमान केला नाही, परकीय शक्तींची मदत घेतली नाही. ते म्हणाले की, NDA म्हणजे N - नवा भारत (New India), D - प्रगती (Development), A - आकांक्षा (Aspirations). आज तरुण, महिला, मध्यमवर्ग, दलित आणि वंचितांचा एनडीएवर विश्वास आहे, असेही मोदी म्हणाले.
'एनडीए काळाच्या कसोटीवर उतरली' : नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, 'जेव्हा सत्तेच्या मजबुरीमुळे आणि भ्रष्टाचाराच्या इराद्याने युती केली जाते, जेव्हा युती कुटुंबवादाच्या धोरणावर आधारित असते, जेव्हा जातीयवाद, प्रादेशिकता डोळ्यासमोर ठेवून युती केली जाते, तेव्हा त्या युतीमुळे देशाचे खूप नुकसान होते. ही बैठक बंगळुरूमधील विरोधी पक्षांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली. याकडे सत्ताधारी पक्षाचे शक्तीप्रदर्शन म्हणून देखील पाहिले जात आहे. बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, केंद्रातील सत्ताधारी युती काळाच्या कसोटीवर उतरली आहे. ही युती राष्ट्रीय प्रगती आणि प्रादेशिक आकांक्षा पूर्ण करू इच्छित आहे.