मुंबई - राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी आज मुंबईत बोलताना शेतकरी आंदोलनावर वक्तव्य केले. शेतकरी आंदोलनाचे लोन देशातील इतर भागात पसरेल, फक्त दिल्लीपर्यंत सीमीत राहणार नाही, अशी शक्यता आहे. शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. त्याचा सहशनशीलतेचा अंत पाहू नका, अशी विनंती आणि सुचना मी केंद्र सरकारला करतो, असे शरद पवार म्हणाले.
शेतकरी आंदोलनावर काय म्हणाले शरद पवार?
'शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या तीन कृषी कायद्यासंबंधीच्या आहेत. जेव्हा हे कायदे संसदेत मांडण्यात आले होते. तेव्हा घाईघाईने हे कायदे मंजूर करण्यात आले. १५ ते २० मिनीटांच्या अंतराने तिन्ही कायदे मंजूर करण्यात आले. नाममात्र, चर्चा करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांकडून यावर प्रतिक्रिया आल्याशिवाय राहणार नाही, असे सांगितले असतानाही हे कायदे मंजूर करण्यात आली. त्यामुळे या कायद्यांवर फेरविचार करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आधी कायदे मागे घ्या त्यानंतर चर्चाकरून तोडगा काढू, असे शेतकरी म्हणत आहेत. मात्र, केंद्र सरकार त्यास तयार नाही. त्यामुळे हा संघर्ष आणखी काही काळ चालेल, असे दिसत असल्याचे शरद पवार म्हणाले.