दंतेवाडा Naxalite Incident : छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी दीड डझन वाहनं पेटवून दिली आहेत. ही सर्व वाहनं खासगी बांधकाम कंपनीची आहेत. बैलाडीला रोडवर रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्री नक्षलवाद्यांनी ही जाळपोळ केल्याची घटना घडली असून या जाळपोळीत मोठ्या प्रमाणात वाहनांच नुकसान झालंय.
150 हून अधिक नक्षलवादी पोहोचले : दंतेवाडा ते बैलाडीला दरम्यान सध्या रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे. आरसी कॅनॉल कंपनी हे काम करुन घेत आहे. भानसी पोलीस स्टेशनपासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या बंगाली कॅम्पजवळ कंपनीनं आपला कॅम्प बांधला आहे. काल रात्री 2 वाजण्याच्या सुमारास 150 हून अधिक नक्षलवादी तिथं पोहोचले आणि त्यांनी रस्ता बांधकामासाठी असलेल्या वाहनांना आग लावली. शेकडो नक्षलवाद्यांमध्ये गणवेशधारी सशस्त्र नक्षलवाद्यांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येतंय.
दंतेवाडा एसपी गौरव राय यांचा नक्षलवादी घटनेला दुजोरा : नक्षलवाद्यांनी वाहनांची जाळपोळ करुन घटनास्थळावरून पळ काढल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी नक्षलवाद्यांनी घटनास्थळी उपस्थित चौकीदारांना धमकावून बांधकाम बंद पाडण्याची धमकी दिली तसंच भविष्यातही अशा घटना घडणार असल्याचं सांगितलं. घटनास्थळावरुन काही बॅनर पोस्टरही जप्त करण्यात आले आहेत. यानंतर घटनास्थळी फौजफाटा रवाना करण्यात आलाय. याप्रकरणी ग्रामस्थांचीही चौकशी केली जात आहे.