महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

PowerGame? : शरद पवारांनी दिल्लीत घेतली पंतप्रधानांची भेट, तासभर खलबतं; तर्क-वितर्कांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने पुन्हा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दोघांची बैठक जवळपास एक तास चालल्याची माहिती आहे. बैठकीनंतर शरद पवार यांनी टि्वट करून राष्ट्रीय हिताच्या विविध विषयांवर चर्चा झाल्याचे म्हटलं. तथापि, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यानंतर, 16 जुलै रोजी शरद पवार यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती.

Sharad Pawar -Narendra Modi
नरेंद्र मोदी -शरद पवार

By

Published : Jul 17, 2021, 1:22 PM IST

Updated : Jul 17, 2021, 1:58 PM IST

नवी दिल्ली -गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण गरम आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने पुन्हा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. पंतप्रधान आणि शरद पवार यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. बैठकीनंतर शरद पवार यांनी टि्वट केले असून राष्ट्रीय हिताच्या विविध विषयांवर चर्चा झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान, शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती. त्यानंतर आज शरद पवार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

सहकार मंत्रालयाविषयी चर्चा?

गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यावेळी केंद्र सरकारकडून नव्या सहकार खात्याची निर्मिती करण्यात आली आहे. हे खातं अमित शाह यांच्याकडे असणार आहे. महाराष्ट्रात सहकार विभागात विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची पाळंमुळं रुजली आहेत. ही पार्श्वभूमी पाहता याबद्दल आजच्या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

पीयूष गोयल, राजनाथ सिंहांचीही घेतली भेट

दरम्यान, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीही दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यानंतर, 16 जुलै रोजी शरद पवार यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली होती. या नेत्यांना भेटल्यानंतर पवार यांच्या पंतप्रधानांसोबतच्या भेटीचे वेगवेगळे राजकीय अर्थ लावले जात आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याने पवार दबावतंत्राचा वापर यामाध्यमातून करत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

उद्धव ठाकरेंनीही घेतली होती मोदींची खासगीत भेट

गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत गेले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक पवारदेखील त्यांच्यासोबत होते. या तिन्ही नेत्यांनी मोदींची भेट घेतली. यानंतर अर्धा तास पंतप्रधानांसोबत खासगीतही उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली होती. या भेटीनंतर आता मोदी आणि पवारांची भेट झाली आहे.

राष्ट्रपतीपदासाठी पवारांचे नाव?

गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा केली जात आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटीमध्ये राष्ट्रपतीपदाविषयी देखील चर्चा झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच काही दिवसांपूर्वी राजकीय निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांचीही शरद पवारांनी भेट घेतली होती. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकांवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

देवेंद्र फडणवीसही दिल्लीत

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही नुकतेच दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यादरम्यान त्यांनी पंतप्रधानांसह काही मंत्र्यांची भेट घेतली होती. त्यातच शरद पवार यांनीही पंतप्रधानांची भेट घेतल्याने या दोन्ही भेटींमागील राजकीय कारणेही जुळवून बघितली जात आहेत. त्यामुळे दिल्लीत सध्या राजकीय वारे वेगाने वाहत असल्याची चर्चा होताना दिसत आहे.

Last Updated : Jul 17, 2021, 1:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details