मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भेट घेतली सिहोर (मध्य प्रदेश) Muslim Woman Beaten For Voting BJP : मध्य प्रदेशातील सिहोरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका मुस्लिम महिलेनं आपल्या मेव्हण्याविरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल केली. या महिलेचा आरोप आहे की, मेव्हण्यानं तिला निवडणुकीत भाजपाला मतदान केल्यामुळे मारहाण केली आहे. विडंबनेची बाब म्हणजे, ही घटना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या जिल्ह्यात घडली आहे.
काय आहे प्रकरण : पीडित महिलेच्या तक्रारीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात भादंवि २९४, ३२३, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपी मेहुण्याला अटक केली. पीडित महिलेनं सांगितलं की, ती सोमवार, ४ डिसेंबर रोजी सायंकाळी तिच्या मुलांसोबत भाजपाच्या विजयाचा आनंद साजरा करत होती. यावेळी तिचे मेहुणे जावेद खान आणि वडील बहेद खान यांनी तिला, तू भाजपाला मत का दिलं? असा प्रश्न विचारत शिवीगाळ सुरू केली. महिलेनं याचा प्रतिकार केला असता, त्यांनी तिला मारपीट करण्यास सुरुवात केली.
बांबूनं मारहाण केली : या दरम्यान जावेदच्या हाताला बांबूची काठी लागली. त्यानंतर त्यानं तिच्या दोन्ही हातावर, गालावर आणि शरीरावर काठीनं वार केले. जावेद आणि त्याच्या पत्नीनं या महिलेला जिवे मारण्याचीही धमकी दिली. महिलेनं जेव्हा मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला, तेव्हा तिचा आवाज ऐकून शेजारी राहणारे पंडित विद्या सागर मदतीला धावून आले. या घटनेत महिलेच्या दोन्ही हाताला, गालाला आणि पायाला जखमा झाल्या आहेत.
शिवराज सिंह चौहान यांनी भेट घेतली : शुक्रवारी (८ डिसेंबरला) ही घटना उघडकीस आली. यानंतर आज शनिवारी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या पीडित महिलेची भेट घेतली. महिला आपल्या मुलांसह मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहचली. यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी तिच्या प्रकृतीची विचारपूस करून सुरक्षा आणि सन्मानाचं आश्वासन दिलं. "तुम्ही मतदानाचा हक्क बजावला. हा अधिकार प्रत्येकाला आहे. तुम्ही अजिबात चूक केली नाही. आम्ही तुमची पूर्ण काळजी घेऊ", असं मुख्यमंत्री म्हणाले. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मेहुण्याला अटक करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
हे वाचलंत का :
- राजकीय वादातून मागास जातीच्या कुटुंबीयांच्या घरावर हल्ला, साहित्यासह वाहनांची तोडफोड
- करणी सेनेच्या अध्यक्षाची घरात घुसून हत्या, पाहा थरारक Video