कोलकाता -भाजपा नेते मुकुल रॉय यांनी आपला मुलगा शुभ्रांशु रॉय यांच्यासह पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुकुल रॉय हे ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये सामील झाले. तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मुकुल रॉय यांनी सध्याच्या परिस्थितीत कोणीही भाजपामध्ये राहू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली. भाजपाचे आणखी बरेच नेते पक्षाला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांना उधाण आहे.
तृणमूल काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुकुल रॉय म्हणाले की, मी भाजपा सोडला आणि टीएमसीमध्ये आलो आहे. बंगालमध्ये जी परिस्थिती आहे, अशा परिस्थितीत कोणीही भाजपमध्ये राहणार नाही. माध्यमांच्या वृत्तानुसार, तृणमूल काँग्रेसमध्ये पश्चिम बंगाल भाजपामधील अनेक बडे नेते प्रवेश करणार आहेत. तृणमूल काँग्रेसमध्ये मोठ्या संख्येने नवनिर्वाचित भाजपा आमदार जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. तथापि, तृणमूल सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी हे स्पष्ट केले आहे की, ज्या लोकांनी तृणमूल सोडले आणि निवडणुकीपूर्वी ताबडतोब भाजपामध्ये प्रवेश केला, त्यांना पुन्हा पक्षात समाविष्ट केले जाणार नाही.
रॉय यांनी टीएमसीत प्रवेश केल्यानंतर ‘घर का लडका घर वापस आया है,’ अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली. मुकुल यांची घरवापसी झाली आहे. निवडणूक प्रचारादरम्यानही मुकुल रॉय विरोधात बोलले नाहीत. त्यांच्यासोबत कधीही मतभेद नव्हते, असे ममता म्हणाल्या. मुकुल रॉय यांना भाजपामध्ये धमक्या येत असत, ज्याचा त्यांच्या आरोग्यावरही मोठा परिणाम झाला, असे ममतांनी सांगितले. तसेच रॉय यांची आता तृणमूलमध्ये असलेली भूमिका ममतांनी स्पष्ट केली. मुकुल रॉय यांनी यापूर्वीही महत्वाची भूमिका साकारली होती. भविष्यातही तीच भूमिका राहील. तृणमूल एक कुटुंब आहे, असे ममता म्हणाल्या.