भोपाळ MP Assembly Election : येत्या नोव्हेंबर महिन्यात मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरममध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. सोमवारी निवडणूक आयोगानं या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. त्यानंतर आता भाजपानं मध्य प्रदेशातील ५७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना त्यांच्या नेहमीच्या बुधना मतदारसंघातून तिकीट मिळालं असून, गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना दतियामधून तिकीट देण्यात आलंय. भाजपानं आतापर्यंत राज्यातील १३६ जागांवर उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.
भाजपाची दिग्गजांवरच मदार : भाजपाच्या चौथ्या यादीत अनेक दिग्गजांना तिकीट देण्यात आलंय. पक्षाचे ज्येष्ठ आणि शक्तिशाली नेते गोपाल भार्गव यांना राहली, विश्वास सारंग यांना नरेला आणि भूपेंद्र सिंह यांना खुराई मतदारसंघातून तिकीट देण्यात आलंय. अटेरमधून अरविंद सिंह भदौरिया, ग्वाल्हेरमधून प्रद्युमन सिंग तोमर, सुरखीमधून सिंधिया समर्थक गोविंद सिंह राजपूत, सागरमधून शैलेंद्र जैन, खरगापूरमधून उमा भारती यांचे पुतणे राहुल सिंग लोधी आणि देवतलाबमधून गिरीश गौतम यांना तिकीट मिळालं आहे.
माजी मुख्यमंत्र्यांच्या सुनेला उमेदवारी : रीवामधून राजेंद्र शुक्ला, अनुपपूरमधून बिसाहुलाल सिंह, विजयराघवगडमधून संजय पाठक, पाटणमधून अजन विष्णोई, हरदामधून कमल पटेल, सांचीमधून प्रभुराम पटेल, सिलवानीमधून रामपाल सिंग आणि माजी मुख्यमंत्र्यांची सून कृष्णा गौर यांना भोपाळच्या गोविंदपुरा येथून तिकीट मिळालं आहे. तुलसीराव सिलावत यांना सावेर, विजय शाह यांना हरसूद आणि रामेश्वर शर्मा यांना हुजूरमधून उमेदवारी देण्यात आलीय.
३ केंद्रीय मंत्र्यांसह ७ खासदारांना तिकीट : भाजपानं यापूर्वीच उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या होत्या. पक्षानं पहिल्या यादीत ३९ उमेदवारांची नावं जाहीर केली होती. तर दुसऱ्या यादीतही ३९ उमेदवारांना तिकीट देण्यात आलं. दुसऱ्या यादीत भाजपानं ३ केंद्रीय मंत्र्यांसह ७ खासदारांना तिकीट देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. यावरून भाजपासाठी हे राज्य किती महत्वाचं आहे हे कळतं. भाजपानं केवळ एका उमेदवाराच्या नावाची तिसरी यादी जाहीर केली होती. ज्यात पक्षानं छिंदवाडा येथील अमरवाडा येथून मोनिका शाह बत्ती यांना तिकीट दिलंय.
हेही वाचा :
- Assembly Elections 2023 Dates : पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं, कोणत्या राज्यात कधी मतदान, वाचा सविस्तर