नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना मंगळवारी संसदेच्या उर्वरित पावसाळी अधिवेशनासाठी सभापती जगदीप धनखड यांनी राज्यसभेतून निलंबित केले. डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेतील असभ्य, अशोभनीय वर्तनासाठी चालू संसदेच्या उर्वरित सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहे. सभागृहाचे नेते पियुष गोयल यांनी सभागृहाच्या कामकाजात सातत्याने अडथळा आणणे, सभापतींची अवज्ञा करणे आणि सभागृहात गोंधळ निर्माण केल्याबद्दल त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. जो सभापतींनी मान्य केला.
तत्पूर्वी, दिल्ली सेवा विधेयक सोमवारी संसदेत मंजूर होण्यापूर्वी, ते राज्यसभेत चर्चेसाठी आणि मंजूरीसाठी ठेवण्यात आले होते. यादरम्यान सभापती जगदीप धनखड आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्यात बाचाबाची झाली. दोन्ही सभागृहात सतत घोषणाबाजी आणि वारंवार तहकूब केल्यानंतर, राज्यसभेच्या अध्यक्षांनी सोमवारी टीएमसी खासदारावर टीका केली आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली (दुरुस्ती) विधेयकावरील चर्चेदरम्यान सभागृहाच्या शिष्टाचारात अडथळा आणल्याचा आरोप केला. 2023.