पाटणा :पाटणा उच्च न्यायालयात मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या याचिकेवरील सुनावणी 12 जानेवारी 2024 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती संदीप कुमार यांनी पुढील आदेशापर्यंत कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशावरील स्थगिती कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. गेल्या सुनावणीत न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला 15 मे 2023 पर्यंत स्थगिती दिली होती.
राहुल गांधींची पाटणा उच्च न्यायालयात याचिका : पाटण्याच्या कनिष्ठ न्यायालयाने मोदी आडनाव प्रकरणात केलेल्या टिप्पणीवर आपली भूमिका मांडण्यासाठी त्यांना 12 एप्रिल 2023 रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. कनिष्ठ न्यायालयाच्या त्या आदेशाविरोधात राहुल गांधी यांनी हा आदेश रद्द करण्यासाठी पाटणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांची याचिका मान्य करून न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे. त्यानुसार, आता त्यांना सध्या पाटण्याच्या कनिष्ठ न्यायालयात हजर राहावे लागणार नाही.
झारखंड उच्च न्यायालयाकडूनही मोठा दिलासा : राहुल गांधी यांना या प्रकरणी झारखंड उच्च न्यायालयाकडूनही मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत कारवाईला स्थगिती दिली आहे. मोदी आडनाव वाद प्रकरणात एमपी एमएलए कोर्टाने त्यांना 4 जुलै रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. याला राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 ऑगस्ट रोजी होणार आहे. या प्रकरणी राहुल गांधींवर झारखंडमध्ये दोन खटले सुरू आहेत.