महाराष्ट्र

maharashtra

Jayant Patil : इस्रायलच्या महावाणिज्य दूतांना मंत्री जयंत पाटील म्हणाले, 'अशी ही बनवाबनवी' पहाच..

By

Published : Mar 30, 2022, 5:41 PM IST

भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांचे संबंध घनिष्ठ राहिले आहेत. याचाच प्रत्यय इस्रायलचे महावाणिज्य दूत ( Consul General of Israel ) आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील या दोघांच्या ट्विटमधून आला आहे. मराठी चित्रपट 'अशी ही बनवाबनवी' चा इस्रायलशी खास संबंध आहे. त्यामुळे तुम्ही एकदा हा चित्रपट पहाच, असा सल्लाच जयंत पाटलांनी त्यांना दिलाय.

मुंबई : राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी इस्रायलचे मुंबईमधील महावाणिज्य दूत कोब्बी शोषणी यांना सुपरहिट राहिलेला मराठी चित्रपट 'अशी ही बनवाबनवी' पाहण्याच्या सल्ला दिला आहे. या चित्रपटाचा इस्रायलशी संबंध असल्याचे जयंत पाटील यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नुकतीच कोब्बी शोषणी यांची मुंबईमधील इस्रायलच्या महावाणिज्य दूतावासामध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी पाटलांनी त्यांना एक पुस्तकही भेट दिले. यावेळी या दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चाही झाली. इस्रायल आणि महाराष्ट्रासाठी पाणी अत्यंत महत्वाचे असल्याचे कोब्बी शोषणी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

२ स्टेट्स आणि टीन चित्रपट पहाच : जयंत पाटील यांच्यासोबत भेट झाल्यानंतर शोषणी यांनी दुसरे ट्विट केले आहे. त्यानुसार शोषणी यांनी जयंत पाटील यांना एक सल्लाही दिला. शोषणी म्हणाले की, 'जशी आपल्यात चर्चा झाली त्यानुसार मी तुम्हाला अभिनेत्री विद्या बालन सोबत २ स्टेट्स आणि टीन हे दोन चित्रपट पाहण्यास सुचवतो.

जयंत पाटलांनी दिला इस्रायलचा संदर्भ : आपल्या खुमासदार शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या जयंत पाटलांनी शोषणी यांच्या या ट्विटला उत्तर दिले. पाटील म्हणाले की, तुम्ही सुचवलेले चित्रपट पाहण्याचा मी प्रयत्न करेल. बॉलिवूडच्या चित्रपटांबाबत तुमचे प्रेम आकर्षक आहे. मी तुम्हाला मराठी चित्रपट पाहण्यास सुचवतो. त्यासाठी मी मराठी चित्रपट 'अशी ही बनवाबनवी'ची क्लिपही देतो. त्यात इस्रायलचाही संदर्भ आहे., असे म्हटले आहे.

डायबेटीसच्या औषधाचा संदर्भ : 'अशी ही बनवाबनवी' हा एक विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटातील अनेक डायलॉग आजही मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहेत. जयंत पाटलांनी शेअर केलेल्या क्लिपमध्ये अभिनेते अशोक सराफ यांचा एक डायलॉग आहे. ते म्हणतात की, 'इस्रायलमध्ये डायबेटीसवर औषध आहे. पण इस्रायलमध्ये.'

ट्विटवर मजेशीर प्रतिक्रिया : मंत्री जयंत पाटील यांनी केलेल्या या ट्विटवर मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. या प्रतिक्रियांमध्ये 'अशी ही बनवाबनवी' चित्रपटातील काही डायलॉग्जचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details