डेहराडून (उत्तराखंड) : चारधामच्या यात्रेकरूंसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा उत्साहात सुरू असताना, हवामानाची स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढू शकतात. बद्रीनाथ धाममध्ये सतत पाऊस आणि केदारनाथ धाममध्ये बर्फवृष्टी होत आहे. दुसरीकडे, हवामान खात्याने 28 आणि 29 एप्रिल रोजी पाऊस, गारपीट, विजांचा कडकडाट आणि हिमवृष्टीसह यलो अलर्ट जारी केला आहे. यासोबतच 30 एप्रिल आणि 1 मे रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
प्रवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन : बद्रीनाथ धाममध्ये आदल्या दिवशी जोरदार पाऊस झाला. तर केदारनाथमध्येही बर्फवृष्टीनंतर तापमानात घट झाली आहे. सकाळच्या वेळी हवामानात प्रत्येक क्षणी बदल होत असून आकाशात ढग दाटून येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना हवामानाची माहिती घेऊन पुढील प्रवासाला जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दुसरीकडे, हवामानाचे स्वरूप पाहता, रुद्रप्रयागचे जिल्हाधिकारी मयूर दीक्षित यांनी प्रवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, खराब हवामान पाहता चारधाम यात्रेकरूंनी त्यांचा प्रवास आठवडाभर पुढे ढकलावा.