इस्लामाबाद :दुपारच्या नमाजावेळी करण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्याने पाकिस्तान हादरला आहे. पेशावरमधील पोलीस लाईन परिसरात असलेल्या मशीदीत हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात किमान 28 नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. हा आत्मघातकी हल्ला असून हल्लोखोराने स्वताला उडवल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. मशीदीत दुपारच्या नमाजासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. त्यामुळे या आत्मघाती हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असली तरी अद्याप अधिकृत आकडा समोर आला नाही.
कराचीमध्ये झाला होता बॉम्बस्फोट :पाकिस्तानच्या कराचीमध्ये 13 मे 2022 च्या रात्री बॉम्बस्फोट झाला होता. यावेळी झालेल्या बॉम्बस्फोटात एका नागरिकाचा मृत्यू झाला होता, तर 13 जण जखमी झाले होते. हा स्फोट कराचीतील सर्वात वर्दळीचा व्यावसायिक भाग असलेल्या हॉटेलबाहेर झाला होता. याप्रकरणी हॉटेलबाहेरील डस्टबिनमध्ये स्फोट झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र हा बॉम्ब पेरण्यात आला होता की स्फोट अन्य कोणत्या कारणाने झाला हे स्पष्ट होऊ शकले नव्हते.
मेमन मशिदीजवळही झाला होता बॉम्बस्फोट :पाकिस्तानमध्ये यापूर्वीही मशिदींवर हल्ले झाले आहेत. 16 मे 2022 रोजी पाकिस्तानच्या कराची शहरात असाच बॉम्बहल्ला झाला होता. एमए जिना रोडवरील मेमन मशिदीजवळ हा बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात एका महिलेने आपला जीव गमवला होता. तर इतर 8 जण गंभीर जखमी झाले. या जखमींमध्ये एका पोलिसाचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मशीदीवरही हल्ले होत असल्याने हल्लेखोरांनी मशीदीला आपले लक्ष्य केल्याचे स्पष्ट झाले.
कराची विद्यापीठात झाला होता आत्मघातकी हल्ला :पाकिस्तानमधील कराची विद्यापीठात 26 एप्रिल 2022 रोजी आत्मघाती हल्ला झाला होता. या आत्मघातकी हल्ल्यात 3 चिनी नागरिकांसह एका पाकिस्तानी नागरिकाचाही मृत्यू झाला होता. आत्मघातकी हल्ल्यानंतर त्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने घेतली होती. शरी बलूच याने हा आत्महघातकी हल्ला केला होता. त्यामुळे पाकिस्तानात चांगलीच दहशत निर्माण झाली होती. पाकिस्तानात अनेक देशातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी दाखल झाले होते. मात्र झालेल्या हल्ल्यामुळे परदेशी विद्यार्थ्यांच्या मनात चांगलीच दहशत निर्माण झाली.
हेही वाचा - Bharat Jodo Yatra Today : जम्मू-काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेचा समारोप, द्वेषाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी ही यात्रा काढल्याचे खरगेंचे उच्चार