नवी दिल्ली -आजपासून नवीन महिन्याला सुरुवात होत आहे. नवीन महिना महागाईचा नवा हप्ताही घेऊन येत आहे. 1 ऑगस्टपासून, म्हणजेच आजपासून, देशभरात बँकिंग आणि इंडिया पोस्टसह इतर क्षेत्रांशी संबंधित अनेक नियम बदलले जात आहेत. या बदलांचा तुमच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावरही परिणाम होईल.
हे नियम आजपासून लागू होत आहेत. जाणून घ्या, हे बदल कोणते आहेत आणि ते तुमच्यावर कसे परिणाम करतील.
एटीएममधून पैसे काढण्याचे शुल्क वाढणार
जर तुम्ही तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढले, तर यासाठी तुम्हाला आजच्या तुलनेत जास्त शुल्क भरावे लागेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सर्व बँकांना 1 ऑगस्टपासून त्यांचे इंटरचेंज शुल्क वाढवण्याची परवानगी दिली आहे. सध्या बँका प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी 15 रुपये इंटरचेंज चार्ज म्हणून आकारतात. आता 1 ऑगस्टपासून 2 रुपयांच्या वाढीसह, हे शुल्क 17 रुपये असेल. जर आपण नॉन-फायनेंशियल व्यवहारांबद्दल बोललो तर सध्या 5 रुपये इंटरचेंज शुल्क भरावे लागतात, जे आता 1 ऑगस्टपासून 6 रुपये होईल. आरबीआयच्या सुधारित नियमांनुसार ग्राहक त्यांच्या बँकेच्या एटीएममधून दरमहा पाच मोफत व्यवहार करू शकतात. त्याच वेळी, ग्राहक इतर बँकांच्या एटीएममधून मेट्रो शहरांमध्ये तीन आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये पाच मोफत एटीएम व्यवहार करू शकतात. यानंतर तुम्हाला प्रत्येक व्यवहारासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.
ICICI बँकेच्या सेवा होतील महाग
भारतातील आघाडीच्या खासगी बँक ICICI च्या अनेक सेवा वापरताना, तुम्हाला 1 ऑगस्टपासून जास्त पैसे द्यावे लागतील. बचत खातेधारकांसाठी एटीएम इंटरचेंज फी आणि चेक बुक शुल्क उद्यापासून वाढणार आहे. यासह, बँक आपल्या ग्राहकांना चार मोफत व्यवहार करण्याची सुविधा देईल. त्यानंतर तुम्हाला प्रति व्यवहार 150 रुपये शुल्क भरावे लागेल.