नवी दिल्ली : Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेला संबोधित करतात. हा कार्यक्रम प्रथम हिंदीमध्ये प्रसारित केला जातो आणि नंतर लवकरच तो प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जातो. या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान विविध विषयांवर भाष्य करत असतात. आज (24 सप्टेंबर) झालेल्या कार्यक्रमात मोदींनी 'G20' परिषद आयोजनावरुन भारतीयांचं कौतुक केलं. तसेच 'G20' च्या आयोजनामुळं भारतीयांचा आनंद द्विगुणीत झाल्याचंही ते म्हणाले.
G-20 कार्यक्रमानं भारतीयाचा आनंद द्विगुणित :'चंद्रयान-3' च्या यशानंतर, G-20 च्या भव्य कार्यक्रमानं प्रत्येक भारतीयाचा आनंद द्विगुणित केलाय. या शिखर परिषदेत भारतानं आफ्रिकन युनियनला G-20 चा पूर्ण सदस्य बनवून आपलं नेतृत्व सिद्ध केलंय. त्यामुळं ही शिखर परिषद भारतीयांसाठी महत्वाची होती व ती यशस्वी करण्यात आली. शिखर परिषदेदरम्यान प्रस्तावित केलेला भारत-मध्य-पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर शेकडो वर्षांसाठी जागतिक व्यापाराचा आधार बनेल, असं प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमातून केलं.
G20 युनिव्हर्सिटी कनेक्ट प्रोग्राम : पंतप्रधान मोदी म्हणाले की, जी-20 कार्यक्रमाशी भारतीय तरुण कशा प्रकारे जोडले जातात यावर चर्चा करणं महत्त्वाचं आहे. वर्षभरात देशातील विविध विद्यापीठांमध्ये G20 शी संबंधित कार्यक्रम झाले. यात आता दिल्लीत आणखी एक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे, ज्याचं नाव आहे 'G20 University Connect Programme'. याद्वारे देशभरातील लाखो विद्यापीठातील विद्यार्थी एकमेकांशी जोडले जातील. यामध्ये आयआयटी, आयआयएम, एनआयटी आणि वैद्यकीय महाविद्यालयांसह अनेक प्रतिष्ठित संस्था सहभागी होणार आहेत. 26 सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
जर्मनीच्या कासमीचा उल्लेख : 27 सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन आहे. काही लोक पर्यटनाकडं केवळं प्रेक्षणीय स्थळ म्हणून पाहतात, परंतु पर्यटनाचा एक खूप मोठा पैलू रोजगाराशी संबंधित आहे. तुम्ही कुठेही प्रवास करण्याचा विचार कराल तेव्हा भारतातील विविधता पाहण्याचा प्रयत्न करा, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना केलीय. तसेच जर्मनीची रहिवासी असलेल्या 21 वर्षीय कासमीचाही उल्लेख यावेळी पंतप्रधानांनी केला. मोदी म्हणाले की, 21 वर्षीय कासमी सध्या इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. जर्मनीत राहणाऱ्या कासमी या कधीही भारतात आल्या नाहीत. पण, त्या भारतीय संगीताच्या चाहत्या आहेत. भारतीय संगीतातील त्यांची आवड खूपच प्रभावी आहे.