कटक (ओडिशा) :देशभरात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. टोमॅटोच्या दरात वाढ झाल्यानंतर अनेक विचित्र घटना समोर येत आहेत. कुठे टोमॅटोच्या ट्रकची चोरी होत आहे, तर कुठे टोमॅटोच्या सुरक्षेसाठी चक्क बॉडीगार्ड तैनात केले गेले आहेत. आता ओडिशातील कटकमधून एक ताजी घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने दोन किलो टोमॅटोसाठी दोन अल्पवयीन मुलांना भाजी विक्रेत्याकडे गहाण ठेवले. आश्चर्याचे म्हणजे, भाजी विक्रेत्यानेही दोन्ही मुलांना सुमारे दोन तास ओलीस ठेवले होते. ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
अल्पवयीन मुलांना भाजी विक्रेत्याकडे गहाण ठेवले : ही घटना कटकच्या छत्रबाजार भागात घडली आहे. या अल्पवयीन मुलांनी सांगितले की, त्यांना एका व्यक्तीने भुवनेश्वरहून सामान इतरत्र शिफ्ट करण्यासाठी 300 रुपये देऊन आणले होते. तेथे आल्यावर तो व्यक्ती छतबाजारच्या एका टोमॅटोच्या दुकानात गेला. तेथे त्याने दोन किलो टोमॅटो विकत घेतले. मात्र त्या व्यक्तीने आपण पैसे आणायला विसरलो असे सांगितले. त्यानंतर त्याने काही वेळात पैसे घेऊन येतो असे सांगत या दोन्ही अल्पवयीन मुलांना भाजी विक्रेत्याकडे गहाण म्हणून ठेवले. यानंतर तो व्यक्ती दोन किलो टोमॅटो घेऊन तेथून पळून गेला.