महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 7, 2021, 10:49 AM IST

ETV Bharat / bharat

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग; दीदी आणि मोदी आमने-सामने

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जींचा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना होणार आहे.

ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सत्तेत येण्यासाठी भाजपाकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. तर सत्ता कायम ठेवण्यासाठी आणि भाजपाचा राज्यात प्रवेश रोखण्यासाठी तृणमूल काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही लढाई प्रतिष्ठेची बनली आहे. आजचा दिवस पश्चिम बंगालमधील राजकीय दृष्टीकोनातून खास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकाता येथे आज एका मेळाव्याला संबोधित करणार आहेत. तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सिलिगुडीमध्ये पदयात्रा करतील.

एलपीजीच्या वाढत्या किंमतींच्या विरोधात ममता आज सिलीगुडी येथे मोर्चा काढतील. या पदयात्रेत हजारो लोक सहभागी होतील. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राज्यात तब्बल 300 प्रचारसभा घेणार असल्याची माहिती आहे.ममता बॅनर्जी यांच्या रणनीतीनुसार त्यांना प्रत्येक मतदारसंघामध्ये एक प्रचारसभा घ्यायची आहे. त्यासाठी त्यांनी सुमारे 300 प्रचारसभांचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये काही प्रचारयात्रांचा समावेशही आहे. विशेष म्हणजे ममतांनी नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तर ममता यांच्याविरोधात सुवेंदू अधिकारी यांना भाजपाने मैदानात उतरवलं आहे.

मोदींची पहिलीच प्रचारयात्रा -

पंतप्रधान शहरातील ब्रिगेड परेड मैदानावर जाहीर प्रचारसभा घेणार आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ही मोदींची पहिलीच प्रचारयात्रा असणार आहे. बंगालमध्ये मोदींच्या तब्बल 20 प्रचारसभा घेण्यात येणार आहेत. या सभेमध्ये प्रचाराची रणनीती आणि उमेदवारांबाबत चर्चा होईल, असे सांगण्यात येत आहे. सर्वच ठिकाणच्या भाजपा नेत्यांकडून पंतप्रधानांच्या रॅलीची मागणी करण्यात आल्यामुळे अशा प्रकारे प्रचारयात्रा नियोजित करण्यात आल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक -

पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान 8 टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा हा 27 मार्चला पार पडेल. तर दुसरा टप्पा हा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पातील मतदान 17 एप्रिलला, तर सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिलला आणि आठवा टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला पार पडेल.

ABOUT THE AUTHOR

...view details