कोलकाता - तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी भाजपा वगळता सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिले आहे. ममतांनी सर्व नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. लोकशाही वाचवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्रित होणे आवश्यक आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता यांनी पत्रात लिहिले आहे. जवळपास सात पानांचे खरमरीत पत्र ममतांनी लिहले आहे. भाजपाने लोकशाही आणि संविधानावर हल्ला केला आहे. या हल्ल्याच्या विरोधात एकत्रित येऊन प्रभावीपणे संघर्ष केला गेला पाहिजे, असे ममता यांनी पत्रात म्हटलं.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ममता बॅनर्जी, काँग्रेसचे अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टालिन, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन , आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बीजद अध्यक्ष आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला, पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती आणि माकपचे सरचिटणीस यांना पत्र लिहिले आहे.