महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

खरगे यांना INDIA आघाडीचा चेहरा निवडण्यामागे काय आहे राजकारण? जाणून घ्या - INDIA आघाडीचा चेहरा

INDIA PM Face : ममता बॅनर्जी यांनी 'इंडिया' आघाडीच्या चौथ्या बैठकीत विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यांच्या या निर्णयाला राजकीय जाणकार मास्टरस्ट्रोक म्हणत आहेत. काय आहे या निर्णयामागचं राजकारण, जाणून घेण्यासाठी वाचा हा खास रिपोर्ट..

INDIA PM Face
INDIA PM Face

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 19, 2023, 10:11 PM IST

कोलकाता INDIA PM Face :राजधानी नवी दिल्लीत झालेल्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान पदासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. ममता बॅनर्जींचा हा प्रस्ताव अनेक अर्थांनी मास्टरस्ट्रोक ठरू शकतो.

गांधी घरण्याच्या बाहेरचा चेहरा : ममता बॅनर्जी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना 'इंडिया' अलायन्सचा चेहरा म्हणून घोषित करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. अचानक करण्यात आलेल्या या प्रस्तावाला दोन कारणं दिली जाऊ शकतात. प्रथम, विरोधी पक्षाचा चेहरा किंवा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून खरगे यांची निवड गांधी घरण्याच्या बाहेरचा चेहरा म्हणून समोर केली जाऊ शकते. जर आघाडीनं आणखी ४-५ महिन्यांच्या कालावधीत सत्ताधारी भाजपा विरोधात देशभरात मुसंडी मारली, तर पंतप्रधान मोदींना वंशवादाचा मुद्दा उगाळून विरोधकांवर टीका करता येणार नाही. गांधी घराण्याबाहेरील काँग्रेसचा नेता विरोधकांचा चेहरा होण्याची ही अलीकडच्या काळातील पहिलीच वेळ आहे. हा प्रस्ताव पश्चिम बंगालमधून आला असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याला दुजोरा दिला आहे.

दक्षिणेतील नेते : दुसरं म्हणजे, मल्लिकार्जुन खरगे हे दक्षिणेतील नेते आहेत. यामुळे, गेल्या मे महिन्यात कर्नाटक गमावल्यानंतर आधीच अडचणीत असलेल्या भाजपाला दक्षिण भारतात उद्ध्वस्त करण्यास विरोधकांना आणखी बळ मिळेल. अलिकडच्या काळात विरोधी आघाडीच्या बैठकीत वारंवार आघाडीच्या चेहऱ्याबाबत विचारणा होत आहे. अशा परिस्थितीत, तृणमूलमधून बोललं जात आहे की, ममता बॅनर्जी या भाजपाविरुद्धच्या लढाईत यशस्वी ठरल्या असून त्यांना 'इंडिया' आघाडीचा चेहरा बनवण्यात यावं. तसेच बिहारमधून नितीश कुमार यांनी आघाडीचं नेतृत्व करावं, अशी कुजबुजही सुरू आहे.

दलित पंतप्रधानांचा चेहरा असावा : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांनी असा प्रस्ताव दिला की, सध्या देशात दलित राष्ट्रपती (द्रौपदी मुर्मू) आहेत. त्यामुळे आघाडीनं दलित पंतप्रधानांचा चेहरा समोर ठेवून निवडणुकीत उतरावं. काँग्रेस हे जाहीरपणे मान्य करत नसली तरी निवडणुकीनंतरच चेहरा निश्चित होईल, असं त्या म्हणाल्या.

काँग्रेस विरोध करू शकत नाही : या निर्णयावर राजकीय विश्लेषक राजू राहा म्हणाले की, ममता बॅनर्जींचा प्रस्ताव हा मास्टरस्ट्रोक होता. "काँग्रेस या निर्णयाला विरोधही करू शकत नाही. कारण आघाडीचा चेहरा काँग्रेसचाच असावा, असं काँग्रेस गेल्या अनेक दिवसांपासून म्हणत आहे. अशावेळी गांधी घराण्याच्या बाहेरील मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव सुचविल्यानं काँग्रेसला मोठ्या पेचप्रसंगात टाकलं आहे," असं राहा यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितलं.

केजरीवालांचं समर्थन : त्याच वेळी, हा प्रस्ताव अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांसारख्या नेत्यांकडून येत असल्यानं, तो विरोधकांना एकसंघ करण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण असू शकतो. ते असेही म्हणाले की, "जर हा निर्णय आघाडीनं मान्य केला, तर ममता बॅनर्जी या विरोधी इंडिया आघाडीच्या महत्त्वपूर्ण प्रेरक शक्ती ठरतील. या क्षणी आपण हे विसरता कामा नये की भाजपाला दक्षिणेत अद्याप यश मिळालेलं नाही. त्यात जर तुम्ही दक्षिणेतील नेत्याच्या विरोधात मतदान केलं तर त्याचा मतपेटीवर नक्कीच चांगला परिणाम होईल."

सीताराम येचुरी काय म्हणाले : मंगळवारी या प्रस्तावानंतर स्वत: मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, आधी आघाडीला जिंकू द्या, मग पंतप्रधान कोण होतं ते बघू. आजच्या बैठकीनंतर आघाडीच्या अनेक नेत्यांना हा मुद्दा थेट टाळायचा होता. सीपीएमचे अखिल भारतीय सरचिटणीस सीताराम येचुरी म्हणाले की, "मला याबाबत काहीही माहिती नाही. मात्र, जागावाटप आणि समान किमान कार्यक्रमांवर चर्चा झाली. त्याचवेळी ईव्हीएमबाबतही चर्चा झाली," असं ते म्हणाले.

भाजपाला पराभूत करायचं आहे : ममता बॅनर्जी यांनी आघाडीचा चेहरा म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवल्याचं या बैठकीत उपस्थित अनेक नेत्यांनी सांगितलं. मात्र, नंतर खुद्द मल्लिकार्जुन खरगे यांनी हे प्रकरण फेटाळून लावलं. काँग्रेस नेते पीसी थॉमस म्हणाले, "दिवसभराच्या बैठकीत ममता बॅनर्जींनी दलित पंतप्रधान चेहरा असावा, असा प्रस्ताव मांडला होता. परंतु प्रस्ताव पुढे गेला नाही." तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बॅनर्जी म्हणाले की, "ममता बॅनर्जींना देशातील लोकांच्या नसा चांगल्याप्रकारे समजतात. याआधी ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, त्यांना चेहरा व्हायचं नाही, मात्र त्यांना भाजपाला पराभूत करायचं आहे. या प्रस्तावानं ते पुन्हा एकदा सिद्ध झालं," असं ते म्हणाले.

हे वाचलंत का :

  1. २०२४ मध्ये मोदी Vs खरगे सामना रंगणार? 'INDIA' बैठकीत ममता बॅनर्जींचा प्रस्ताव

ABOUT THE AUTHOR

...view details