नवी दिल्ली Mallikarjun Kharge : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'ची माहिती दिली. ही यात्रा 6700 किलोमीटरचं अंतर कसं पार करेल हे त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मणिपूरचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. पंतप्रधान सर्वत्र फिरत आहेत पण ते मणिपूरला का जात नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पंतप्रधान मणिपूरला का जात नाहीत : "मणिपूरमध्ये दुर्दैवी घटना घडल्या. मोदीजी कधी समुद्रावर जातात किंवा पोहण्याचे फोटो सेशन करतात. ते कधी मंदिरात जाऊन फोटो काढतात. कधी केरळमध्ये जाऊन फोटो काढतात तर कधी मुंबईत जाऊन फोटो काढतात. ते सगळीकडे जातात आणि नवनवीन कपडे घालून फोटो काढतात. मात्र जिथे लोक मरत आहेत, जिथे महिलांवर बलात्कार होत आहेत तिथे हे महापुरुष का गेले नाहीत? पंतप्रधान मणिपूरला का जात नाहीत? तो देशाचा भाग नाही का?" असे जळजळीत सवाल खरगेंनी उपस्थित केले.
सरकारनं आम्हाला बोलू दिलं नाही : केंद्रावर निशाणा साधत खरगे म्हणाले, "आम्ही संसदेत देशाशी संबंधित मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सरकारनं आम्हाला बोलू दिलं नाही. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच 146 खासदारांना निलंबित करण्यात आलं. त्यामुळेच आम्ही 'भारत जोडो न्याय यात्रे'च्या माध्यमातून लोकांमध्ये जात आहोत. जेणेकरून आम्हाला आमचे विचार त्यांच्यासमोर मांडता येतील आणि समाजातील प्रत्येक घटकाला भेटून त्यांचं म्हणणं ऐकता येईल".
भारत जोडो न्याय यात्रेचा प्रवास : मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी 'भारत जोडो न्याय यात्रे'चा लोगो लाँच केला. ही यात्रा देशवासीयांना आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय मिळवून देण्याच्या दिशेनं एक मजबूत पाऊल असल्याचं ते म्हणाले. "आम्ही 14 जानेवारीपासून 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू करणार आहोत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ही यात्रा मणिपूरमधील इम्फाळ येथून सुरू होणार असून ती नागालँड, आसाम मार्गे देशातील 15 राज्यांतून मुंबई पर्यंत प्रवास करेल. 110 जिल्ह्यातून जाणारी ही यात्रा लोकसभेच्या 100 आणि विधानसभेच्या 337 जागांना कव्हर करेल. या दरम्यान सुमारे 6700 किलोमीटरचं अंतर कापलं जाईल", असं त्यांनी स्पष्ट केलं.
हे वाचलंत का :
- राहुल गांधींच्या 'भारत न्याय यात्रे'द्वारे काँग्रेस काय साध्य करणार?
- २०२४ मध्ये मोदी Vs खरगे सामना रंगणार? 'INDIA' बैठकीत ममता बॅनर्जींचा प्रस्ताव