नवी दिल्ली :काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसच्या पारंपरिक दलित मतपेटीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे 5 जुलैपासून 212 निवडक विधानसभा आणि 61 लोकसभा मतदार संघांमध्ये दलितांना जोडण्यासाठी नॅशनल लीडरशिप डेव्हलपमेंट मिशन (LDM) ही मोहीम सुरू करणार आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये काँग्रेसने मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेस पक्षाध्यक्षपदी निवड केली होती. काँग्रेस पक्षात संसदीय लोकशाही असल्याचेच या निवडीतून काँग्रेसने दाखवून दिले होते.
नॅशनल लीडरशिप डेव्हलपमेंट मिशन :काँग्रेस पक्षापासून दलित दुरावल्याची स्थिती गेल्या काही वर्षापासून पुढे येत आहे. त्यामुळे काँग्रेसने मल्लिकार्जुन खर्गे यांची पक्षाध्यक्षपदी निवड केल्यानंतर दलित मतपेटीला आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे 5 जुलैला नॅशनल लीडरशिप डेव्हलपमेंट मिशन (LDM) लाँच करणार आहेत. आम्ही या कार्यक्रमावर काम करत असून ही योजना आजपासून सुरू होत असल्याचे एससी, एसटी, ओबीसी सेलचे राष्ट्रीय समन्वयक के राजू यांनी ईटीव्ही भारतला सांगितले आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्याहस्ते आज अॅप लॉन्च करण्यात येणार असून त्याद्वारे या योजनेचे निरीक्षण केले जाईल, असेही के राजू यांनी यावेळी स्पष्ट केले.
राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि तेलंगणामध्ये योजना :नॅशनल लीडरशिप डेव्हलपमेंट मिशन LDM ही दीर्घकालीन योजना आहे. मात्र ती राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या चार राज्यांमधील 212 राखीव विधानसभा जागांवर सुरू केली जाणार असल्याची माहिती के राजू यांनी दिली. या चारही राज्यात यावर्षी निवडणुका होणार आहेत. 2024 मध्ये निवडणुका होणार्या 61 राखीव लोकसभा मतदार संघांमध्येही ही योजना सुरू केली जाईल. 61 राखीव लोकसभा जागेवर 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यामुळे लोकसभा निवडणूक 2024 मध्येही पक्ष तिथे जोमाने लढणार आहे.