खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये एक खासगी प्रवासी बस पुलावरून खाली कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल 15 प्रवाशांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या अपघातात अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. ही घटना ठिकरी महामार्गावरील डोंगरगावाजवळ बोराड नदीवर बांधण्यात आलेल्या पुलावर घडली आहे. बोराड नदीच्या पुलावरुन कोसळलेली बस मा शारदा ट्रॅव्हल्सची असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. प्रशासकीय अधिकारी आणि रुग्णवाहिका घटनास्थळावर बचाव कार्य करत आहेत.
स्थानिक नागरिकांनी सुरू केले बाचावकार्य :खासगी प्रवाशी बस पुलाखाली कोसळल्याची माहिती कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळावर धाव गेतली. यावेळी स्थानिक नागरिकांनी जखमी प्रवाशांना बसबाहेर काढण्यास सुरूवात केली. नागरिकांनी घटनास्थळावर मदत कार्य सुरू केल्याने जखमी प्रवाशांना मोठी मदत झाली.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता :हा भीषण अपघात खरगोन जिल्ह्यातील ठिकरी रोडवर झाला असून बस पुलाखाली पडताच आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरडा सुरू केला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलीस जवान दाखल झाले. पोलीस ठाण्याच्या जवानांनी मदतकार्य सुरू केले. पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
कसा झाला अपघात :ठिकरी रोडवर बोराडजवळ बांधण्यात आलेल्या पुलावरुन मा शारदा ट्रॅव्हल्सची ही बस जात होती. यावेळी बोराड नदीवरील या पुलावर अचानक बस अनियंत्रित झाली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस पुलाखाली कोसळली. बस पुलावरून पडताच प्रवाशांचा गोंधळ उडाला. बचाव पथक सतत प्रवाशांना बाहेर काढून रुग्णालयात पाठवत आहे. बोराड नदी कोरडी पडल्याने बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही बस मा शारदा ट्रॅव्हल्सची असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.