Mahatma Jyotiba Phule Death Anniversary : महात्मा ज्योतिबा फुले हे विचारवंत, समाजसुधारक आणि लेखक होते. अस्पृश्यता, जातिव्यवस्थेचं निर्मूलन, स्त्रियांना आणि मागासवर्गीयांना शिक्षण देणं अशी समाजहिताची अनेक कार्य करणारे महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची आज (28 नोव्हेंबर) पुण्यतिथी आहे. या निमित्तान आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊया.
* जाणून घेऊया महात्मा फुलेंशी संबंधित काही खास गोष्टी :
- गोविंदराव फुले आणि चिमणाबाई यांच्या पोटी ज्योतिबा फुले यांचा 11 एप्रिल 1827 ला जन्म झाला. महात्मा फुले यांचं मूळचं आडनाव हे गोऱ्हे असं होतं. मात्र त्यांचा फुले विकण्याचा व्यवसाय असल्यामुळं त्यांचे फुले हे आडनाव रुळलं.
- महात्मा फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात 1848 ला मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्यामुळं त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. त्यांच्या वडिलांनीही त्यांना घराबाहेर काढलं. मात्र तरीही त्यांनी हा विरोध झुगारुन रास्तापेठ आणि वेताळपेठेत 1851 ला पुन्हा मुलींसाठी दोन शाळा सुरू केल्या. त्यांच्या या कार्यामुळं त्यांचा 1852 ला ब्रिटीशांच्या शिक्षण विभागाच्या वतीनं मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली गौरव करण्यात आला.
- दलित आणि दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी महात्मा फुले यांनी 1873 मध्ये 'सत्यशोधक समाज' ची स्थापना केली.
- महात्मा फुलेंच्या समाज सेवेनं प्रभावित होऊन 1888 मध्ये मुंबईच्या एका सभेत त्यांना 'महात्मा' या उपाधी बहाल करण्यात आली.
- महात्मा फुलेंनी पुरोहिताविना विवाह सोहळा सुरू केला. त्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मान्यताही मिळाली. महात्मा फुले हे बालविवाहाच्या विरोधात होते. विधवा पुनर्विवाहाचे समर्थक होते.
- महात्मा फुलेंनी अनेक पुस्तकं लिहिली. यात गुलामगिरी , शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब, सत्सार, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म आदींचा समावेश आहे.
- महात्मा ज्योतिबा फुले यांनी दलित शब्दाचा व्यापक वापर करत हा शब्द समाज जाणीवेशी जोडला. त्याआधी या समाजासाठी अस्पृश्य, अंतज यांसारख्या शब्दांचा वापर केला जात होता.
- ज्योतिबा फुले आणि त्यांचं संघटनाच्या संघर्षामुळं सरकारनं कृषी कायदा लागू केला.