रायपूर/दिल्ली Mahadev Betting App Case :ईडीनं 1 जानेवारीला रायपूरमधील मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) विशेष न्यायालयात महादेव अॅप प्रकरणात 1700 ते 1800 पानांचं नवीन आरोपपत्र दाखल केलं. या आरोपपत्रात ईडीनं कथित कुरिअरच्या नव्या वक्तव्याचा उल्लेख केलाय. ईडीनं म्हटलंय की, असीम दासने त्याच्या वकिलासह त्याला भेटायला आलेल्या एका व्यक्तीच्या प्रभावाखाली आपलं विधान मागं घेतलं होतं. त्या व्यक्तीने दासला एक टाईप केलेला दस्तऐवज दिला आणि त्याला स्वतःच्या हस्ताक्षरात ते सादर करण्यास सांगितलं. याचा खटल्यात फायदा होईल, असा विचार करून दासने त्यावर स्वाक्षरी केली.
दास त्याच्या पहिल्या विधानावर ठाम :ईडीने म्हटलंय की, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी 3 नोव्हेंबरला असीम दास आणि पोलीस हवालदार भीम सिंह यादव यांना अटक करण्यात आली होती. यावेळी असीम दासने, महादेव सट्टेबाजी अॅपच्या प्रवर्तकांनी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 508 कोटी रुपये दिल्याचा दावा केला होता. मात्र, त्यानंतर 12 डिसेंबरला असीम दासने आपली साक्ष फिरवली. तुरुंगातून ईडीच्या संचालकांना लिहिलेल्या पत्रात त्याने म्हटलं की, आपल्याला फसवलं गेलं आहे आणि आपण कोणत्याही नेत्याला पैसे पाठवले नाहीत. तसंच त्याला इंग्रजी येत नसतानाही अधिकार्यांनी इंग्रजीत लिहिलेल्या निवेदनावर सही करण्यास भाग पाडल्याचंही दासने पत्रात म्हटलं होतं. दरम्यान, आता पुन्हा एकदा असीम दासनं आपण आपल्या पहिल्या विधानावर ठाम असल्याचं म्हंटलंय.