भोपाळ/रायपूर Assembly Election 2023 :मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, मध्य प्रदेशमध्ये दिवसभरात ७१.१६ टक्के मतदान झालं असून छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील ७० जागांवर ६८.१५ टक्के मतदान झालं.
मध्य प्रदेशात सर्व जागांसाठी एकत्र मतदान : मध्य प्रदेशात एकाच टप्प्यात मतदान पार पडलं. विधानसभेच्या सर्व २३० जागांसाठी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. येथे दुपारी १ वाजेपर्यंत ४५.४० तर दुपारी ३ वाजेपर्यंत ६०.५२ टक्के मतदान झालं होतं. या निवडणुकीत २५०० हून अधिक उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. राज्यात जवळपास ५.५९ कोटी मतदार असून, त्यात २.८७ कोटी पुरुष आणि २.७१ कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. निवडणूक आयोगानुसार, राज्यातील ५००० हून अधिक बूथ महिला चालवतात, तर १८३ मतदान केंद्रं अपंगांद्वारे चालवल्या जाते.
छत्तीसगडमध्ये मतदानाचा दुसरा टप्पा : छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या ९० जागा असून, ७ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात २० जागांसाठी मतदान झालं होतं. या सर्व जागा नक्षलग्रस्त भागात होत्या. शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात उरलेल्या ७० जागांसाठी मतदान झालं. दिवसभरात राज्यात ६८.१५ टक्के मतदान झालं. दुपारी १ वाजेपर्यंत ३८.२२ टक्के, तर दुपारी ३ वाजेपर्यंत ५५.३१ टक्के मतदान झालं होतं.