श्रीनगर - जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी लष्कर-ए-तोयबाच्या टॉपच्या कमांडरला श्रीनगरमध्ये अटक केली आहे. पोलिसांना हा कमांडर अनेक गुन्ह्यांमध्ये हवा होता. इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीसचे (काश्मीर झोन) विजय कुमार म्हणाले ही अटक म्हणजे पोलिसांचे मोठे यश आहे.
इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीसचे (काश्मीर झोन) विजय कुमार यांनी ट्विट करून दहशतवाद्याच्या अटकेची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की लष्कर-ए-तोयबाचा कमांडर नदीम अब्रार याला अटक केली आहे. हा आरोपी विविध खुन प्रकरणात सहभागी आहे. हे आमच्यासाठी मोठे यश आहे.
हेही वाचा-'माझ्या 100 वर्षीय आईने लस घेतली, तुम्हीही घ्या, अफवांवर विश्वास ठेवू नका', मोदींचे आवाहन
राष्ट्रीय महामार्गावरून दहशतवाद्याला अटक-
पोलीस सुत्राने दिलेल्या माहितीनुसार अब्रार आणि त्याचे सहकारी हे कारमधून राष्ट्रीय महामार्गावरून जात होते. पोलिसांनी त्यांना श्रीनगरच्या बाहेर असलेल्या प्रिपोरो येथे ताब्यात घेतले आहे. लॉवीपुरा येथे तीन सीरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यात अब्रारचा सहभाग होता. तो डिसेंबर २०१८ पासून विविध दहशतवादी मोहिमांमध्ये सहभागी होता, अशी माहिती सुत्राने दिली आहे.
हेही वाचा-‘ट्विटर’च्या अडचणींत वाढ, तक्रार निवारण अधिकारी धमेंद्र चतुर यांचा राजीनामा
दहशतवाद्यांनी माजी पोलीस अधिकाऱ्याला केले ठार
- जम्मूमध्ये ड्रोन हल्ला घटनेच्या 24 तासांच्या आतच दहशतवाद्यांनी काश्मीरच्या पुलवामा येथे एका माजी विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) फैयाज अहमद यांना गोळ्या घालून ठार केले. पुलवामामधील अवंतीपोरा येथील हरिपरिगम गावात ही घटना घडली. दहशतवाद्यांनी एसपीओ फैयाज अहमद यांच्या घरात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. या दहशतवादी कारवाईत फैयाजचा जागीच मृत्यू झाला आणि त्यांची पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहीद फयाज अहमद यांच्या पत्नीचेही रुग्णालयात निधन झाले. तर मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा-राजनाथ सिंह लडाख दौऱ्यावर; रणनीतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण पुलांचे उद्घाटन तर सुरक्षेचाही आढावा
जम्मू विमानतळावर स्फोट -
- जम्मू विमानतळावर पाच मिनिटांच्या अंतराने दोन स्फोट शुक्रवारी झाले. एक स्फोट हा तांत्रिक विभागात तर दुसरा मोकळ्या जागेत झाला होता. यात दोन जवान जखमी झाले होते. जम्मू हवाई तळाजवळ स्फोट घडवण्यासाठी दहशतवाद्यांकडून दोन ड्रोनचा वापर करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली जम्मू काश्मिरच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत कलम 370 चा मुद्दा काश्मिरी नेते उपस्थित करतील आणि गोंधळ घालतील, अशी आशा पाकिस्तानला होती. मात्र, बैठक शांततेत व चांगल्या वातावरणात पार पडली. यामुळे पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांचे प्रमुख निराश झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच एकामागून एक दहशतवादी घटना घडवत आहेत.
दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला -
- शनिवारी काश्मीरमध्ये ग्रेनेडमध्ये हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकल्यानंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. ग्रेनेड फेकलेल्या दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाकडून शोध सुरू आहे. ग्रेनेडचा स्फोट झाल्यानंतर मोठे नुकसान झाले नाही. यापूर्वी दहशतवाद्यांनी 7 मे रोजी श्रीनगरमधील नवा बाजार परिसरातील सुरक्षा दलावर ग्रेनेड फेकले होते. शोपियान जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने कंठस्नान घातल्यानंतर ग्रेनेड फेकल्याची घटना समोर आली होती.
एक दहशतवादी शरण आला -
- हांजीपुरा येथील घरात चार दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. यातील एक दहशतवादी ठार करण्यात आले. तर दुसऱ्या दहशतवाद्यांला सैन्यदलातील अधिकाऱ्याने शरण येण्याचे आवाहन केले होते. मेजर शुक्ला यांनी आवाहन केल्यानंतर दहशतवादी शरण आला. एक दहशतवादी ठार तर दुसरा शरण आल्याने इतर दोन दहशतवाद्यांचा गावात शोध सुरू आहे. अजूनही गावामध्ये दोन दहशतवादी लपून बसल्याची शक्यताही आयजीपी विजय कुमार यांनी व्यक्त केली.