तिरुवअनंतपुरम : कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)च्या नेतृत्त्वाखाली लेफ्ट डेमॉक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ)ने केरळमध्ये इतिहास रचला आहे. गेल्या चाळीस वर्षांमध्ये पहिल्यांदाच केरळमध्ये एका सरकारला जनतेने पुन्हा निवडून दिलं आहे. हा विजयदेखील एलडीएफने थोड्याफार फरकाने नाही, तर यूडीएफचा धुव्वा उडवत मोठ्या फरकाने मिळवला आहे.
या विजयानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी जनतेचे आभार मानले. ते म्हणाले, की जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला, आणि आम्ही जनतेवर. विरोधी पक्षांनी केलेल्या कित्येक आरोपांनंतरही जनतेने पिनराई सरकारवर विश्वास दाखवला. पिनराई विजयन यांच्यावर वैयक्तिक टीका करण्यात आली होती, तसेच शबरीमला आणि इतर मुद्द्यांवरुनही मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत होती. मात्र, तरीही केरळच्या १४ पैकी ११ जिल्ह्यांमध्ये लोकांनी विजयन यांच्यावर विश्वास दर्शवला.
यूडीएफ केवळ तीन जिल्ह्यांमध्ये प्रभावी..
मलबार भाग आणि उत्तर केरळमधील कासारगोड, कन्नूर, कोळीकोड आणि पलक्कड जिल्ह्यांमध्ये डाव्यांची पकड आणखी घट्ट झालेली पहायला मिळाली. यासोबतच थिस्सूर, कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यांनीही एलडीएफला पसंती दर्शवली. तसेच आलापुळा, पठानमथिट्टा, कोल्लम आणि तिरुवअनंतपुरममध्येही एलडीएफचा विजय झाला. यूडीएफला केवळ वायनाड, एर्नाकुलम आणि मलप्पुरम जिल्ह्यांमध्ये समाधान मानावं लागलं.